शेतकऱ्याचा मुलगा एका रात्रीमध्ये करोडपती झाल्यामुळे संपूर्ण गावात दिवाळीचं वातावरण आहे. शेतकऱ्याचा मुलगा असलेला जगन्नाथ सिंग सिदार याने ड्रीम 11 या फॅन्टसी क्रिकेट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक कोटी रुपये जिंकून इतिहास घडवला आहे.
आदिवासी समाजातून येणाऱ्या जगन्नाथला 23 मार्चला झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या सामन्यातून एक कोटी रुपये मिळाले. क्रिकेटची समज आणि योग्य रणनीतीमध्ये अव्वल ठरल्यामुळे जगन्नाथ करोडपती झाला आहे.
जगन्नाथने त्याच्या ड्रीम इलेव्हनच्या टीममध्ये जे.डफीला कर्णधार आणि एच.राऊफला उपकर्णधार केलं होतं. जगन्नाथच्या टीमने एकूण 1138 पॉईंट्स मिळवले, त्यामुळे तो पहिल्या क्रमांकावर राहिला आणि एक कोटी रुपये जिंकला.
जगन्नाथच्या गावात दिवाळी
छत्तीसगडच्या गोधिकालन गावातील रहिवासी जगन्नाथ याच्या या कामगिरीनंतर त्याच्या गावात आनंदाची लाट पसरली आहे. त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमली आहे. लोक मिठाई वाटून जगन्नाथाच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत आहेत. जगन्नाथने सांगितले की, आतापर्यंत त्याने त्याच्या खात्यातून ७ लाख रुपये काढले आहेत आणि उर्वरित पैसेही हळूहळू येत आहेत. विजयाच्या आनंदासोबतच त्याने त्याच्या भविष्यातील योजनाही सांगितल्या.
‘आमचे कच्चे घर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झाले आहे, जे आम्ही आता मोठे आणि कायमस्वरूपी बनवू. तसंच वडिलांना चांगले उपचार देऊ आणि शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करू, जेणेकरून आपली शेती सोपी होईल. एवढे पैसे मिळतील, असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझं आणि माझ्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण झाल्याचा हा क्षण आहे’, असं जगन्नाथ म्हणाला आहे.
जगन्नाथचा हा विजय आता गावातल्या इतर लोकांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे. गावातील इतर लोकांनीही आता आपणही ड्रीम 11 वर नशीब आजमावणार असल्याचं सांगितलं आहे. शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या जगन्नाथसाठी 1 कोटी रुपये म्हणजे त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून जाणार आहे, या पैशामुळे जगन्नाथ त्याचं पक्कं घर बांधण्याचं तसंच ट्रॅक्टर घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकणार आहे. पण ड्रीम-11 या ऍपवर कोट्यवधी लोक आपलं नशीब आजमावतात, त्यामुळे प्रत्येकालाच करोडपती होता येत नाही. काही वेळा तर तुम्ही लावलेले पैसेही तुम्हाला परत मिळत नाहीत, त्यामुळे फॅन्टसी गेमचा धोका ओळखूनच खेळा, तसंच त्याच्या आहारी जाऊ नका किंवा त्याचं व्यसनही लावून घेऊ नका.