कागल पंचतारांकित एमआयडीसी येथील आर्या स्टील रोलिंग इंडिया लिमिटेड या कंपनीतून मालक व मॅनेजर यांचा विश्वास संपादन करून मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह व सळी विक्रेत्यांनी संगनमताने 63 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.
यामध्ये अमरजित अशोक लाड (वय 41, रा. लक्ष्मीनारायण संकुल, प्लॉट नंबर 502, सर्किट हाऊस शेजारी, ताराबाई पार्क, कोल्हापूर), विकास विलास सूर्यवंशी (36, रा. राजवर्धन हॉस्पिटल जवळ, नदी किनारा, सिद्धनेर्ली, ता. कागल), सचिन गणपती मेंगाणे (33, रा. कोल्हापूर-गारगोटी रोड, शेळेवाडी, ता. करवीर) यांना गोकुळ शिरगाव पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अमरजित लाड हा आर्या स्टीलमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहत होता, तर विकास सूर्यवंशी व सचिन मेंगाणे लागणारी सळी खरेदी करत होते. 2022 ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये या तिघांनी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहत असलेल्या लाडने मालक व मॅनेजर यांचा विश्वास संपादन करून विकास सूर्यवंशी यांच्या शिवम टाईल्स नदीकिनारा 33 लाख व सचिन मेंगाणे यांच्या सद्गरू ट्रेडर्स शेळेवाडीला 30 लाखांचा पुरवठा करून एकूण 63 लाखाची संगनमताने कंपनीची फसवणूक केली.
अमरजित लाड हा सराईत गुन्हेगार असून त्याने गेल्या वर्षी बंदूक व चाकूचा धाक दाखवून चोरी केल्याप्रकरणी त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या तिघांनी संगनमताने अपहार करून कंपनीचे नुकसान केल्याप्रकरणी कंपनीचे मॅनेजर मनीष शामराव बामणे यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.