अश्पाक पटेल उत्तम आचारी म्हणून प्रसिद्ध होते. अश्पाक पटेल अपघातात दोन मुलांसह ठार झाल्याची माहिती गावकऱ्यांना कळताच गावावर शोककळा पसरली.
रमजान सणासाठी (Ramadan Festival) खरेदीसाठी दुचाकीवरून गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. येथे झालेल्या अपघातात कुंडलवाडी (Kundalwadi Accident) येथील बापासह दोन लेकरं जागीच ठार झाली, तर लेकरांची आई मृत्यूशी झुंज देत आहे. अश्पाक शब्बीर पटेल (वय ३९), मुलगा अश्रफ (११) आणि असद (९, कुंडलवाडी, ता. वाळवा) असे मृतांची नावे आहेत.
हसीना अश्पाक पटेल (३१) गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मृत अश्पाक, पत्नी हसीना व दोन मुलांसह दुचाकीवरून रमजान सणाच्या खरेदीसाठी मिरज येथे गेले होते. तेथे खरेदी करून कपडे खरेदीसाठी ते इस्लामपूरला (Islampur) निघाले होते.
त्या वेळी पेठ-सांगली महामार्गावर आष्टा येथील शिंदे मळ्याजवळ दुपारी चारच्या सुमारास त्यांची दुचाकी (एमएच १० बीडी २८१९) व समोरून येणारा डंपर (एमएच १० डीटी ०४६८) ची समोरासमोर जोरात धडक झाली. अपघात इतका भीषण होता, की अश्पाक व त्यांची दोन मुले अश्रफ व असद जागीच ठार झाली. त्यांची पत्नी हसीना गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी सांगली येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने रात्री मिरजेच्या शासकीय रुग्णालयात हलवले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तिघांचे मृतदेह पाहून साऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. पवित्र रमजान महिन्यांत झालेल्या अपघाताने शोक व्यक्त करण्यात आला.
बहिणीचाही मृत्यू
काही वर्षांपूर्वी ईदच्या दरम्यानच अश्पाक यांच्या बहिणीचाही मृत्यू झाल्याची ग्रामस्थांत चर्चा होती. आता त्याच्यासह कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.
कुंडलवाडीवर शोककळा…
अश्पाक पटेल उत्तम आचारी म्हणून प्रसिद्ध होते. अश्पाक पटेल अपघातात दोन मुलांसह ठार झाल्याची माहिती गावकऱ्यांना कळताच गावावर शोककळा पसरली. कुटुंबीय व नातलगांनी घटनास्थळी धाव घेतली. अश्पाक यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. शेती व आचारी व्यवसाय हेच त्यांच्या उत्पन्नाचे साधन होते. वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन मुलांची जबाबदारी त्यांच्यावर होती.
जिल्हा परिषद शाळेत तिसरी व पाचवीत मुले शिकत होती. कर्त्या मुलाचा नातवंडांसह मृत्यू व सून गंभीर जखमी झाल्याने अश्पाक यांच्या आई-वडिलांना मानसिक धक्का बसला आहे. या घटनेने सारे कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. ईदच्या खरेदीसाठी बाहेर पडले अन् कुटुंबावर काळाने घाला घातला. कुंडलवाडी गावात रात्री उशिरा पार्थिव आणले. त्यावेळी उपस्थितांनी हंबरडा फोडला.