वहिनीला छेडल्याच्या रागातून मोठ्या भावाने छोट्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. वहिनीवर पाणी शिंपडल्यामुळे मोठ्या भावाने छोट्या भावावर चाकूने वार केले, या हल्ल्यात भावाचा मृत्यू झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये ही घटना घडली आहे. रोहित संजय देठे (वय 24) याने त्याचा 22 वर्षांचा लहान भाऊ सौरभ संजय देठे याच्यावर बुधवारी संध्याकाळी हल्ला केला.
रोहितची पत्नी नंदिनी देठे ही संध्याकाळी घराबाहेर कपडे धूत होती, तेव्हा तिकडे सौरभ आला आणि त्याने नंदिनीवर पाणी शिंपडलं, हे पाहून रोहितला राग आला आणि त्याने सौरभवर चाकूने सपासप वार केले. रोहितने केलेल्या या हल्ल्यामध्ये सौरभ गंभीर जखमी झाला. अशाच अवस्थेत त्याला मंचरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
सौरभवर झालेला हल्ला गंभीर असल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक झाली होती, त्यामुळे त्याला मंचरहून पुण्याच्या ससून रुग्णालयात आणण्यात आलं, पण तिकडे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सौरभ याचा आत्येभाऊ काळूराम जाधव (वय 26, रा. मंचर) याने मंचर पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांनी रोहित देठेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सौरभच्या हत्येप्रकरणी त्याचा भाऊ रोहितला अटक केली आहे.