Saturday, July 26, 2025
Homeमहाराष्ट्रदहावीचा निकाल 95.35 टक्के

दहावीचा निकाल 95.35 टक्के

गोव्याच्या शैक्षणिक इतिहासात प्रथमच दहावीची परीक्षा झाल्यानंतर केवळ 15 दिवसांत गोवा शालांत मंडळातर्फे निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावी परीक्षेचा निकाल 95.35 टक्के लागला असून, मागीलवर्षीच्या तुलनेत या निकालात 2.97 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांनी दिली.

 

पर्वरीत आयोजित पत्रकार परिषदेत शेट्ये बोलत होते. यावेळी सचिव विद्यादत्त नाईक, सहसचिव रीमा मडगावकर आणि उपसचिव भारत चोपडे उपस्थित होते. ही परीक्षा 1 मार्च ते 21 मार्च या दरम्यान आयोजित केली होती. यासाठी एकूण 9280 विद्यार्थी आणि 9558 विद्यार्थिनी असे एकूण 18,838 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 8814 विद्यार्थी आणि 9147 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदाही मुलींनीच बाजी मारली. यावर्षी मुलांची उत्तीर्ण टक्केवारी 94.98 तर मुलींची टक्केवारी 95.71 आहे.

 

शेट्ये म्हणाले की, राज्यातील एकूण 32 केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. तर उत्तरपत्रिका तपासण्यासाठी 8 केंद्रांची सोय करण्यात आली होती. या कालावधीत 2 सार्वजनिक सुट्ट्या आणि तीन रविवार असूनही सर्व शिक्षक आणि शाळांनी उत्तरपत्रिका तपासण्याला प्राधान्य दिल्याने इतक्या कमी कालावधीत निकाल तयार करणे सोपे झाले. यातून राज्य शैक्षणिक वाटचालीत अग्रेसर असल्याचे स्पष्ट होते. 78 सरकारी शाळा, 318 अनुदानित आणि 11 विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. तसेच 4 विशेष शाळांमधून एकूण विविध श्रेणीतील 477 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. त्यापैकी 450 विद्यार्थी पास झाले असून उत्तीर्ण टक्केवारी 94.34 टक्के आहे.

 

पुनर्मुल्यांकनासाठी दर

 

फोटोकॉपीसाठी 350 रुपये प्रति प्रश्नपत्रिका शुल्क भरावे लागेल. त्यांची अंतिम मुदत 15 एप्रिल आहे. तसेच जर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन करायचे असेल तर 700 रुपये प्रति प्रश्नपत्रिका शुल्क असून 19 एप्रिल अंतिम मुदत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -