मोठी बातमी समोर येत आहे, आंध्र प्रदेशमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आंध्र प्रदेशमधील अनकापल्ली जिल्ह्यात अवैध पद्धतीनं सुरू असलेल्या फटाका कारखान्यात आज दुपारी अचानक भीषण स्फोट झाला, अनकापल्ली जिल्ह्यातल्या कोटावुराटमध्ये अवैध पद्धतीनं हा फटाका कारखाना सुरू होता. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले, स्फोटमुळे कारखान्याला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या घटनेच माहिती घेतली, त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना सूचना केल्या आहेत. बचाव कार्याची गती वाढवा, जखमींना तातडीनं वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्या, असं चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे गृहमंत्र्यांनी देखील या दुर्घटनेची माहिती घेतली असून, ते क्षणा-क्षणाला घटनेबाबत अपडेट घेत आहेत. या दुर्घटनेत जे जखमी झाले आहेत, त्यांना चांगल्यातला चांगला उपचार उपलब्ध करून द्या अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांना आणि जे जखमी झाले आहेत त्यांना आर्थिक मदत दिली जाईल असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनकापल्ली जिल्ह्यातल्या कोटावुराटमध्ये अवैध पद्धतीनं हा फटाक्याचा कारखाना सुरू होता, आज दुपारच्या सुमारास या कारख्यान्यात भीषण स्फोट झाला. या घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले होते, त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे, या फटाका कारखान्यामध्ये तीसपेक्षा अधिक मजूर काम करत होते. यातील वीस लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू असून, या स्फोटामुळे पसिरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, भिंतीचे तुकडे जवळपास अर्धा किलोमीटर दूर उडाले आहेत.