कर्जबुडव्या मेहुल चोक्सीला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून 13 हजार 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे. ईडी आणि सीबीआयने त्याला वाँटेड जाहीर केलं होतं.
शनिवारी त्याला सीबीआयच्या विनंतीवरुन अटक करण्यात आली आहे. चोक्सी 13 हजार 500 कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपींपैकी एक असून पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला सीबीआयच्या विनंतीवरून बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आणि आता भारतीय एजन्सींनी प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली आहे.
कोण आहे मेहुल चोक्सी?
एक फरार भारतीय व्यापारी आणि गीतांजली ग्रुपचा मालक
2018 मध्ये भारतातून पळून गेल्यानंतर अँटिग्वा आणि बारबुडाचे नागरिकत्व घेतले
चोक्सीवर त्याचा पुतण्या नीरव मोदीसह पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार 500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप
मेहुल चोक्सीवर कोणते आरोप?
मेहुल चोक्सीनं जानेवारी 2018 मध्ये भारतातून पळ काढला त्यानंतर, काही दिवसांनी पंजाब नॅशनल बँकेत मोठा घोटाळा उघडकीस आला. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी 13 हजार 500 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. 65 वर्षीय मेहुल चोक्सीने अँटिग्वा आणि बारबुडाचे नागरिकत्व घेतले. चोक्सीसोबत, नीरव मोदी देखील भारतातील बँक घोटाळ्यात सह-आरोपी आहे. ज्याची सध्या लंडनहून प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु आहे.
PNB घोटाळा कधी उघडकीस आला?
पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटींचा घोटाळा 2018 मध्ये उघडकीस आला. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी बँकांची हजारो कोटींची फसवणूक केली. घोटाळा उघडकीस आल्यानंतर दोघे काका-पुतणे देश सोडून पळून गेले. मेहुल चोक्सी हा नीरव मोदीचा काका आहे.
चोक्सीकडून जामीनासाठी अर्ज
बेल्जियममध्ये अटक झाल्यानंतर चोक्सीने प्रकृती बिघडल्याचे कारण दिले. हेच कारण देत त्याने जामीन मागितला आहे. चोक्सीचे वकील म्हणतात की, त्यांचे क्लाइंट आजारी आहेत त्यामुळे, त्यांना जामीन दिला जावा. वकिलाने सांगितले की, चोक्सी अँटिग्वा आणि बारबुडाहून बेल्जियममध्ये उपचारासाठी आला होता. त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत अँटवर्पमध्ये राहत होता.
दोन अटक वॉरंटचा हवाला
मेहुल चोक्सीला अटक करताना बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या दोन अटक वॉरंटचा हवाला दिला. याबाबत इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मुंबई न्यायालयाने वॉरंट 23 मे 2018 आणि 15 जून 2021 रोजी जारी करण्यात आले होते.