सोन्याच्या प्रेमात जगभरातील लोक असतात. परंतु भारतीयांचे सोने प्रेम काही वेगळेच आहे. सोने वेगवेगळ्या कारणांसाठी भारतात घेतले जाते. लग्नासारख्या शुभ कार्यात सोने घेतात. अडचणीच्या काळात रक्कम कामात येईल, त्यामुळे सोने घेतले जाते. सोन्यात गुंतवणूकसुद्धा केली जाते. यामुळे भारतीय घरांमध्ये अंदाजे २४,००० ते २५,००० टन सोने असल्याचे म्हटले जाते. भारतात दरवर्षी ८०० टन सोन्याची मागणी होते. एखाद्या विकसित देशाच्या तिजोरीतील रक्कमपेक्षा जास्त सोने भारतीय लोकांच्या घरात आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात अनिश्चितता आली आहे. त्यामुळे १९६७ मध्ये शंभरावर असलेले सोने २०२५ मध्ये लाखांवर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक गुंतकवणूक फर्म गोल्डमॅन सॅक्सने सोन्याच्या दरात तुफान तेजीचा अंदाज वर्तवला आहे. सोन्याचे दर १,३६,००० पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
सोन्याच्या दरात गेल्या महिन्याभरापासून प्रचंड बदल सुरु झाला आहे. कधी सोने अचानक लाखापर्यंत जाणार असा अंदाज व्यक्त केला जात असताना दरात घसरण सुरु झाली. आता पुन्हा सोन्याच्या दरात वाढ सुरु झाली आहे. त्याला अनेक कारणे आहेत. जागतिक आर्थिक परिस्थिती, भू राजकीय तणाव आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून घेण्यात येणारे निर्णय, सोन्यामध्ये होणारी गुंतवणूक यामुळे सोन्याची मागणी वाढतच आहे. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेल्या टॅरिफ वॉरमुळे जगभरातील शेअर बाजार आणि सोने-चांदीच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे.
सोन्याची किंमत कोण ठरवते
ब्रिटनमधील बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर निश्चित केले जातात. या मार्केटचे व्यवस्थापन लंडन बुलियन मार्केट असोसिएशनकडे (एलबीएमए) आहे. त्या संघटनेचे सदस्य मोठमोठे खाणमालक, मोठे उद्योगपती आहेत. एलबीएमए सदस्य सोने-चांदीचे दर ठरवतात. दिवसातून दोन वेळा ही किंमत निश्चित केली जाते. या किंमती सोने आणि इतर धातूंच्या वायदा बाजारानुसार ठरवल्या जातात. सकाळी ११ वाजता आणि दुपारी ३ वाजता दर जाहीर केले जातात. त्यानुसार हा दर प्रत्येक देशात बदलतो.
भारतात कसे वाढत गेले सोन्याचे दर
भारतीय संस्कृतीत सोन्याला अनेक अर्थाने महत्व आहे. भारतात सोने केवळ गुंतवणूक म्हणून नाही तर विविध सणसमारंभासाठी देखील केली जाते. भारतात लग्न तिथी असल्याचा परिणाम सोन्याच्या दरवाढीत होत असतो. भारतात १९५६ मध्ये सोन्याचे दर एका तोळ्यासाठी केवळ ९० रुपये होते. त्यात चढउतार होत होती. १९६७ मध्ये सोन्याने शंभरी गाठली होती. त्यावर्षी सोने १०२ रुपये तोळे झाले. मग १९७२ मध्ये सोने २०० रुपये प्रतितोळ्यांवर जाऊन पोहचले. १९७३ मध्ये सोन्याचे दर २७८ रुपये होते. त्यानंतर वर्षभरात त्यात दुप्पट वाढ झाली. १९७४ मध्ये सोन्याचे दर ५०० रुपयांवर गेले. १९८० मध्ये सोन्याने हजाराचा टप्पा गाठला. २००७ मध्ये सोन्याने दहा हजाराची मर्यादा ओलांडली. आता २००७ ते २०२५ या १८ वर्षांत सोन्याचे दर दहा पट वाढत आहे. सोने २०२५ मध्ये लाखावर जाण्याचा अंदाज आहे. जे सोने २००७ मध्ये दहा हजार रुपये होते, ते २०२५ मध्ये लाखापेक्षा जास्त होईल, असा अंदाज सराफ बाजारातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
टॅरिफ वॉरचा सोन्यावर परिणाम
बँक ऑफ अमेरिका विश्लेषकांच्या मते, पुढील दोन वर्षांत कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे भाव प्रति औंस ३,५०० अमेरिकन डॉलर्सपर्यंत जाणार आहे. भारतीय चलनात हा दर दोन वर्षांत प्रति दहा ग्रॅम १ लाख ५ हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते. गोल्डमन सॅक्स या संस्थेने आपला अंदाज तीन वेळा बदलला आहे. या संस्थेमधील विश्लेषकांनुसार चालू वर्ष २०२५ च्या अखेरीस सोन्याची किंमत प्रति औंस ३३०० अमेरिकन डॉलर म्हणजेच ९९,४०० रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. त्यानंतर त्यांनी हा अंदाज बदलवत ३७०० अमेरिकन डॉलर १ लाख ३० हजारांपर्यंत नेला. ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात अस्थिरता येत आहे. मागणी वाढल्याने सोन्याचे भाव वाढत आहेत. तथापि, काही संशोधन संस्था सोने दरातील वाढीबद्दल फारशा आशावादी दिसत नाहीत.
वर्ष सोने दर
1964 Rs.63.25
1965 Rs.71.75
1966 Rs.83.75
1967 Rs.102.50
1968 Rs.162.00
1969 Rs.176.00
1970 Rs.184.00
1971 Rs.193.00
1972 Rs.202.00
1973 Rs.278.50
1974 Rs.506.00
1975 Rs.540.00
1976 Rs.432.00
1977 Rs.486.00
1978 Rs.685.00
1979 Rs.937.00
1980 Rs.1,330.00
1981 Rs.1670.00
1982 Rs.1,645.00
1983 Rs.1,800.00
1984 Rs.1,970.00
1985 Rs.2,130.00
1986 Rs.2,140.00
1987 Rs.2,570.00
1988 Rs.3,130.00
1989 Rs.3,140.00
1990 Rs.3,200.00
1991 Rs.3,466.00
1992 Rs.4,334.00
1993 Rs.4,140.00
1994 Rs.4,598.00
1995 Rs.4,680.00
1996 Rs.5,160.00
1997 Rs.4,725.00
1998 Rs.4,045.00
1999 Rs.4,234.00
2000 Rs.4,400.00
2001 Rs.4,300.00
2002 Rs.4,990.00
2003 Rs.5,600.00
2004 Rs.5,850.00
2005 Rs.7,000.00
2007 Rs.10,800.00
2008 Rs.12,500.00
2009 Rs.14,500.00
2010 Rs.18,500.00
2011 Rs.26,400.00
2012 Rs.31,050.00
2013 Rs.29,600.00
2014 Rs.28,006.50
2015 Rs.26,343.50
2016 Rs.28,623.50
2017 Rs.29,667.50
2018 Rs.31,438.00
2019 Rs.35,220.00
2020 Rs.48,651.00
2021 Rs.48,720.00
2022 Rs.52,670.00
2023 Rs.65,330.00
2024 Rs.77,913.00
2025 (Till Today) Rs.97,620.00
सोन्याची चमक का होत नाही फिकी
मागणी जास्त आणि पुरवठा कमी हे सूत्र आल्यावर दर वाढत असतात. सोन्याच्या बाबतीतही असेच होत आहे. तसेच लोखंड, अॅल्युमिनियम किंवा इतर कोणताही धातू प्रमाणे सोन्याचा वापर खूप वेगळा आहे. जगात सोने मोठ्या प्रमाणात आढळत नाही. या पिवळ्या-सोनेरी धातूबद्दल अद्भुत आकर्षण मानवला नेहमीच राहिले आहे. यामुळे सोन्याचे दर कितीही वाढले तरी त्याची चमक मानवाला आकर्षितच करत राहिली आहे. सोन्यात असलेल्या विविध गुणांमुळे सोने नेहमीच शक्ती आणि भव्यतेचे प्रतीक मानले गेले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, जागतिक व्यापारात वस्तू खरेदी करण्यासाठी चलनांऐवजी याचा वापर केला जात आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनशी संबंधित उपकरणांमध्ये सोने वापरले जाते. अगदी स्मार्ट फोनमध्येही सोने वापरलेले असते. वैद्यकीय उपकरणे, नॅनोटेक्नॉलॉजी, अवकाश विज्ञानाशी संबंधित उपकरणांमध्ये सोन्याचा वापर केला जातो. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत सोन्याला खूप महत्त्व आहे आणि आजही इतर कोणताही धातू त्याची जागा घेऊ शकलेला नाही. प्रत्येक शक्तिशाली देश त्याचे साठे वाढण्याचा प्रयत्न करत असतो. कोणत्याही वस्तूची किंमत कितीही कमी झाली तरी सोने कधीही इतके कमी होऊ शकत नाही की ते निरुपयोगी मानले जाईल. सोन्यातील गुंतवणुकीचे एक सुरक्षित साधन आहे. यामुळे १९६७ मध्ये शंभरावर असलेले सोने २०२५ मध्ये लाखांवर गेले तरी सराफ बाजारातील वर्दळ कमी होणार नाही.