मित्राच्या घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलाला 12 जणांच्या टोळक्याने दरवाजा तोडून बळजबरीने मोटारीत बसवून बाह्यवळण रस्त्यावरील नेप्ती मार्केटजवळील मोकळ्या जागेत नेले. तिथे त्याला मारहाण करीत नग्न करून सामूहिक अत्याचार केला.
‘याला जिवंत सोडून नका’ असे म्हणत कापडी पंचाने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. अत्याचार करताना निर्दयी टोळक्याने त्याचे व्हिडिओ काढले. ही घटना रविवारी (दि.14) मध्यरात्री घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
एकनाथनगर येथील रावण साम्राज्य ग्रुपचा अध्यक्ष मयूर अनिल आगे, शाहरुख अन्सार पठाण, ओमकार ऊर्फ भैया राहिंज, रोहित पंडागळे, सोनू बारहाते, ऋषिकेश सातपुते (सर्व रा. केडगाव) यांच्यासह अन्य सहा जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे. याबाबत पीडित युवकाने तीन दिवसांनंतर गुरुवारी (दि. 17) कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तीत म्हटले आहे, की 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक संपल्यानंतर नेप्ती रस्त्यावरील मित्राच्या घरी गेलो होतो. रात्री साडेअकरा वाजता आरोपींचे टोळके आलिशान जीपमधून व मोटारसायकलवर तेथे आले. त्यांनी घराचा दरवाजा तोडून मला आणि मित्र व त्याच्या वडिलांना मारहाण केली. मला घराबाहेर रस्त्यावर ओढत नेऊन मारहाण करीत मोटारीत बसविले. तेथून केडगाव बाह्यवळण रस्त्यावरील नेप्ती मार्केटजवळील मोकळ्या जागेत नेले. काही वेळात तेथे मोटारसायकलवरुन आणखी काहीजण आले.
ओमकार राहिंज यांची टपरी आम्ही फोडली व मित्राच्या घरी लपून बसलो होतो, असे बळजबरीने बोलायला लावून व्हिडिओ काढून घेतला. त्यानंतर मयूर आगे याने कपडे काढायला लावले. त्यास नकार देताच गळ्याला कोयता लावला. त्यानंतर घाबरून कपडे काढले. त्यातील तीन ते चार जणांनी अनैसर्गिक अत्याचार केला. अन्य साथीदारांनी त्याचे व्हिडिओ शूटिंग केले.
याला जिवंत सोडता कामा नये, असे अजय शिंदे याने कोयत्याने वार केला. मात्र तो मी चुकविला. कोयत्याने वार केल्यावर पोलिस पकडतील. त्यामुळे गळा आवळून मारू असे म्हणत तीन ते चार जणांनी कापडी पंचाने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. बेशुद्ध पडल्यानंतर मेला, असे समजून तेथून निघून गेले. सोमवारी (दि. 15) सकाळी शुद्धीवर आल्यानंतर कपडे घालून घरी आलो. घरी आईने काय झाले असे विचारले; पण घाबरल्याने काहीच सांगू शकलो नाही. दोन दिवसांनी धक्क्यातून बाहेर आल्यानंतर घडलेला प्रकार सांगितला.
कोतवाली पोलिस ठाण्यात गुरुवारी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अपहरण व अनैसर्गिक अत्याचार, पोस्को आदी कलमान्वये पोलिसांत गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे करीत आहेत.
मुख्य आरोपीसह सहा जणांना अटक
अपहरण व अनैसर्गिक अत्याचार, पोस्कोसारख्या गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी रावण साम्राज्य गु्रपचा अध्यक्ष मयूर अनिल आगे, शाहरुख अन्सार पठाण, ओमकार ऊर्फ भैया राहिंज, रोहित पंडागळे, सोनू बारहाते, ऋषिकेश सातपुते (सर्व रा. केडगाव) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. अन्य आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
केडगावमध्ये मस्साजोगची पुनरावृत्ती
केडगावमध्ये किरकोळ वादातून 12 जणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलाला मित्राच्या घरातून उचलून नेले. त्याला मारहाण करीत अनैसर्गिक अत्याचार केला. बेशुद्ध अवस्थेत मेला म्हणून सोडून दिल्याने सुदैवाने तो वाचला. केडगावमध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोगचीच पुनरावृत्ती झाली, असे म्हणावे लागेल.