महायुतीतील कोल्हापुरातील नेत्यांची बुधवारी (ता.४) मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांसह कोल्हापूर महानगरपालिकेतील इतर पदाधिकाऱ्यांच्या नावांबाबत चर्चा होणार आहे.
कोल्हापुरात नगरपालिकांचे नगराध्यक्ष, महापौरसुद्धा महायुतीचे झाले आहेत. आता जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. १७ मार्चला ही अध्यक्ष निवड होणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अधिक उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांना अध्यक्षपद पाहिजे आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुतोवाच केले आहे. यासोबतच विविध सभापतिपदांसह इतर विषय अजूनही अनुत्तरीत आहेत. त्यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेतील परिवहन समिती सभापती, शिक्षण समिती सभापती यांच्याबाबतही निर्णय झालेला नाही. तेथे कोण कोण इच्छुक आहेत, परिवहन समिती सभापतिपद राष्ट्रवादीला द्यायचे की शिवसेना (शिंदे गट) यांना द्यायचे, याबाबतही चर्चा होणार आहे. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत ठरलेल्या फॉर्म्युलानुसार प्रत्येक पक्षाला सभापती, उपमहापौर, महापौर पदे मिळणार आहेत. मात्र पहिल्यांदा कोणाला याबाबतही अंतर्गत चर्चा सुरू झाली आहे.
यावरही उद्याच्या बैठकीत विशेष चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यात अन्य प्रश्न, गोकुळसह इतर निवडणुका यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या तो अजेंडा नसून महायुतीचे सर्व नेते एकत्रित यावेत, चर्चा व्हावी, यासाठी या बैठकीचे आयोजन केले असल्याचे समजते.
‘सध्या मुंबईत विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आमदार, मंत्री सर्व जण मुंबईत असणार आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले आहे. येथे जिल्हा परिषद अध्यक्षपद, महापालिकेतील सभापतींसह जिल्ह्यातील अन्य विषयांवर आमची चर्चा होणार आहे. निवडणुकीनंतर सर्वजण एकत्रित भेटण्यासाठी मंत्री पाटील यांनी बैठकीचे आयोजन केले आहे.





