मंगळवारी दुपारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली. या भ्याड हल्ल्याची जबाबदारी काही दहशतवादी संघटनांनी स्वीकारली असली तरी, भारताने त्यासाठी थेट पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. या हल्ल्याच्या 24 तासांच्या आत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची ( कैबिनेट कमेटी ऑन सिक्युरिटी – CCS) बैठक झाली. यामध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध एकामागून एक 5 मोठे निर्णय घेतले. भारत आता फक्त निषेध करणार नाही तर कारवाईदेखील करेल असा स्पष्ट संदेश जगाला मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील का झालेल्या या आपत्कालीन बैठकीत भारताने असा सर्जिकल डिप्लोमॅटिक स्ट्राईक केलाय की त्याने पाकिस्तानचं कंबरडंच मोडलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या हल्ल्यात एकही गोळी चालली नाही, तरीही पाकिस्तानचा नाश निश्चित आहे. पाकिस्तानच्या विनाशाची कहाणी लिहिणारे निर्णय कोणते आहेत ते सविस्तर जाणून घेऊया. सर्वात पहिला आणि मोठा निर्णय म्हणजे सिंधू पाणी करार रद्द करणे. हा तोच करार आहे ज्याअंतर्गत भारत गेल्या 60 वर्षांपासून पाकिस्तानला त्याच्या वाट्याचे पाणी देत होता. पण आता हे पाणी थांबवण्याची तयारी करण्यात आली आहे.
सिंधू करार रोखल्याने पाकवर काय होणार परिणाम ?
पाकिस्तानमधील 80०% शेती ही सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे. या नद्यांवर बांधलेल्या अनेक धरणे आणि जलविद्युत प्रकल्पांमधूनही पाकिस्तान वीज निर्मिती करतो. अशा परिस्थितीत, भारताने पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानमध्ये पाणी आणि वीज दोन्हीची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते. याचा मोठा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य जीवनावर होईल.
अटारी पोस्ट बंद
अटारी बॉर्डर पोस्च बंद करण्याचा दुसरा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील औपचारिक व्यापार आधीच थांबला असला तरी, काही वस्तूंचे व्यवहार लहान व्यापाऱ्यांच्या पातळीवर सुरूच होते. आता अटारी पोस्ट बंद झाल्यामुळे, हे छोटे व्यवहार देखील पूर्णपणे थांबतील, ज्यामुळे पाकिस्तानी व्यापाऱ्यांचे थेट नुकसान होईल.
SAARC व्हिसा रोखल्याने एंट्री पूर्णपणे बंद, पाकिस्तानी नागरिकांना भारतात बंदी
तिसऱ्या मोठ्या निर्णयानुसार, भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क व्हिसा योजना पूर्णपणे रद्द केली आहे. तसेच, जे पाकिस्तानी नागरिक कौटुंबिक कारणांसाठी येथे येत होते त्यांनाही भारतात येण्याची परवानगी दिली जाणार नाही. यामुळे दोन्ही देशांमधील मानवी पातळीवरचा संपर्कही संपेल. तसेच, सर्व पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडण्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता.
पाकिस्तानी उच्चायुक्तालयावरही मोठी कारवाई
नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या संरक्षण, लष्कर, हवाई दल आणि नौदल सल्लागारांना सात दिवसांच्या आत देश सोडण्याचे आदेश भारताने दिले आहेत. यासोबतच भारताने इस्लामाबादमधील आपल्या उच्चायुक्तालयातील सर्व सल्लागारांनाही परत बोलावले आहे. याचा अर्थ असा की आता दोन्ही देशांमध्ये लष्करी किंवा राजनैतिक स्तरावरील कोणतीही चर्चा शक्य होणार नाही.
पाकिस्तानवर भारताची सर्वात मोठी कारवाई
भारत आता पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबंध संपवण्याच्या दिशेने कारवाी करत असल्याने आता भारताने स्पष्ट केलं आ. व्हिसा नाही, व्यापार नाही आणि राजनैतिक संवाद नाही. भारताने पाकिस्तानला प्रत्येक आघाड्यावर एकाकी पाडण्याची रणनीती राबवण्यास सुरुवात केली आहे. पहलगाममधील शहीदांचा हा बदला राजनैतिक शस्त्रांनी घेण्यात आला आहे, ज्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे हादरला आहे.