महासत्ता चौक परिसरातील आमराई रोडवरील काळ्या ओवयामध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिला अंदाजे ३० वर्षांची असून तिच्या अंगावर लेगिन्स आणि ड्रेस होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तिची ओळख पटवणे कठीण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह प्रथम इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात आणि नंतर शवविच्छेदनासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवला.
प्राथमिक तपासात महिलेच्या शरीरावर कोणतेही जखमेचे अथवा मारहाणीचे व्रण आढळून आलेले नाहीत. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, गावभाग पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यासह सीमावर्ती कर्नाटक भागातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये बेपत्ता महिलांची माहिती मागवण्याचे काम सुरू केले आहे. मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास केला जात आहे.
या संदर्भात गावभाग पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत असून, मृत्यूमागील कारण आणि महिलेची ओळख पटवणे यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.