रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुने आयपीएलच्या 18 व्या मोसमात अखेर घरच्या मैदानातील सलग 3 पराभवानंतर विजयाचं खातं उघडलं आहे. आरसीबीने 42 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 11 धावांनी मात करत एकूण सहावा विजय मिळवला. आरसीबीने बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र जोश हेझलवूड याने केलेल्या चिवट गोलंदाजीसमोर राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 194 धावाच करता आल्या. राजस्थानचा हा या मोसमातील सलग पाचवा आणि तर एकूण सातवा पराभव ठरला. यासह राजस्थानचं या हंगामातील आव्हान जवळपास संपुष्ठात आलं आहे.
राजस्थान रॉयल्सच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना आश्वासक सुरुवात मिळाली. त्यापैकी यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. मात्र राजस्थानच्या इतर फलंदाजांपैकी एकालाही अखेरच्या क्षणापर्यंत टिकून राहून टीमला विजयी करता आलं नाही. त्यामुळे राजस्थानला सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला.
राजस्थानसाठी यशस्वी जयस्वाल याने 49 आणि ध्रुव जुरेल याने 47 धावा केल्या. या दोघांपैकी एकालाही या खेळीचं मोठ्या धावसंख्येत रुपांतर करता आलं नाही. तसेच नितीश राणा याने 28, वैभव सूर्यवंशी 16, कर्णधार रियान पराग 22, शिमरॉन हेटमायर 11 आणि शुबम दुबे याने 12 धावा केल्या. वानिंदू हसरंगा याच्याकडून अखेरच्या क्षणी अपेक्षा होती. हसरंगाने निराशा केली. हसरंगा 1 रन करुन आऊट झाला. जोफ्रा आर्चर याला भोपळाही फोडता आला नाही. तर तुषार देशपांडे आणि फझलहक फारुकी ही जोडी नॉट आऊट परतली.
आरसीबीकडून जोश हेझलवूड याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जोशने 33 धावांच्या मोबदल्यात चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. जोशला या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कराने गौरवण्यात आलं. जोश व्यतिरिक्त आरसीबीकडून कृणाल पंड्या याने 2 विकेट्स मिळवल्या. तर यश दयाल आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
आरसीबीचा विजयी ‘षटकार’
आरसीबीची बॅटिंग
दरम्यान त्याआधी राजस्थानने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीने विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 5 विकेट्स गमावून 205 धावांपर्यंत मजल मारली. विराटने सर्वाधिक 70 रन्स केल्या. तर देवदत्तने 50 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त फिल सॉल्ट याने 26, टीम डेव्हीड 23 आणि जितेश शर्मा याने नाबाद 20 धावा केल्या. तर राजस्थानकडून संदीप शर्मा याने दोघांना आऊट केलं. तर जोफ्रा आर्चर आणि वानिंदू हसरंगा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.