सोलापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मेहुण्याचे लग्न काही दिवसांवर असताना जावयाने सासू, सासरे आणि मेहुणा यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू झाला. सासू आणि मेहुणा गंभीर जखमी झाले.
मोहोळ तालुक्यातील रामहिंगणे गावात हा धक्कादायक प्रकार घडला. विशेष म्हणजे जावयाने पोलिसांना फोन करुन पाच ते सहा जण आपणास मारत असल्याचे सांगितले होते. पत्नीला नांदवायला पाठवत नसल्याच्या संतापातून जावयाने हा प्रकार केला.
मोहोळ तालुक्यातील वडवळ स्टॉप परिसरात राहणाऱ्या मंगेश देविदास सलगर यांचे लग्न रामहिंगणी येथील बापूराव मासाळ यांची मुलगी निशा सोबत झाले होते. मात्र, कौटुंबीक वादामुळे निशा ही गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून सासरी गेली नाही. गेल्या अडीच वर्षांपासून पत्नीला नांदवायला पाठवत नाही. तसेच न्यायालयात पोटगीसाठी दावा केल्यामुळे जावई मंगेश सलगर यांचा सासू, सासऱ्यावर राग होता. त्या रागातून मंगेश याने सासू-सासऱ्यांवर हल्ला करण्याची योजना तयार केली.
मंगेश सलग याने घराच्या पोर्चमध्ये झोपलेल्या सासरे बापूराव मासाळ यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या तोंडावर, अंगावर व पायावर चाकून अनेक वार केले. त्या हल्ल्यात सासरे बापूराव मासाळ यांचा मृत्यू झाला. बापूराव मासाळ यांच्यावर हल्ला करत असताना मेहुणा अभिषेक बापूराव मासाळ आणि त्याची आई वाचवण्यासाठी गेले. त्यावेळी त्याने त्यांच्यावरही हल्ला केला. त्यानंतर 112 नंबरवर कॉल केला. मला या ठिकाणी पाच ते सहा जण मारत आहे, मला वाचवा, असे त्याने पोलिसांना सांगितले. मंगेश सलगर याने स्वतःलाच इजा करून घेतली होती.
मंगेश सलग याच्या फोननंतर मोहोळ पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यानेच खून करून इतर दोघांना जखमी केल्याचे पोलिसांना दिसले. जखमी झालेल्या सासू आणि मेव्हण्यावर सोलापुरात उपचार सुरू आहे. कौटुंबिक वादातून त्याने हा हल्ला केल्याची कबुली पोलिसांकडे दिली.
बापूराव मासाळ यांचा मोठा मुलगा बाळकृष्ण मासाळ याचे 6 मे रोजी लग्न होते. मात्र, लग्नाच्या 10 दिवस आधीच दुर्दैवी घटना घडली. आरोपी मंगेश सलगर विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे तातडीने पोहचले. त्यांनी पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. तसेच फॉरेन्सिक टीमच्या पथकाने गुन्ह्याच्या संदर्भाने नमुने घेतले आहेत.