गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे पवार कुटुंबातीलच आमदार रोहित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, असे आवाहन केले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील तशीच इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेला हवा मिळाली होती. असे असतानाच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या शक्यतेवर मोठं भाष्य केलंय.
विकास लवंडे नेमकं काय म्हणाले?
“दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील किंवा येऊ शकतात अशा पद्धतीचे वृत्त नेहमीच येते. खरं पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा इंडिया आघाडी, महाविकास आघाडातील महत्त्वाचा पक्ष आहे. हा पक्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे,” असं लवांडे यांनी स्पष्ट केलं.
…तर एकत्र येण्यावर विचार केला जाऊ शकतो
तसेच, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रतिगामी विचारांच्या भाजपासोबत सत्तेत आहे. दोन्ही पक्ष एकत्र यावं असं कोणाला वाटत असेल तर त्यांना माझा नम्र पणाने सांगणं आहे, जेव्हा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेतून, महायुतीतून बाहेर पडेल, भाजपासोबतचं नातं तोडेल तेव्हाच हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर विचार होऊ शकतं. एकत्र येण्याच्या फक्त अफवा आहेत. या बातम्यांत कुटलंही तथ्य नाही, असं विकास लवांडे यांनी स्पष्टपणे सांगितलं.
नेमकं काय होणार?
दरम्यान, राजकारणात काहीही होऊ शकतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार हे कालही माझे दैवत होते, आजही आहेत अशा प्रकारचं भाष्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे अनेक बैठकांत एकत्र बसले होते. या दोगांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चादेखील झालेली आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.