शुबमन गिल याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएल 2025 मधील 51 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 38 धावांनी मात केली आहे. गुजरातने हैदराबादला विजयासाठी 225 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र गुजरातच्या गोलंदाजांसमोर हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 186 धावांपर्यंतच पोहचता आलं. गुजरातने यासह 18 व्या मोसमात एकूण सातवा विजय मिळवला. तर हैदराबादचा हा एकूण सातवा पराभव ठरला. विशेष म्हणजे गुजरातची सनरायजर्स हैदराबादवर या मोसमात विजय मिळवण्याची सलग दुसरी वेळ ठरली. गुजरातने याआधी हैदराबादवर 6 एप्रिलला 7 विकेट्सने विजय मिळवला होता. गुजरातने या विजयासह प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. तर हैदराबादचं पराभवासह प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.
हैदराबादची बॅटिंग
हैदराबादकडून ओपनर अभिषेक शर्मा याचा अपवाद वगळता एकालाही मोठी खेळी करता आली नाही. अभिषेकने हैदराबादसाठी सर्वाधिक 74 धावा केल्या. अभिषेकच्या या खेळीत 6 सिक्स आणि 4 चौकारांचा समावेश होता. अभिषेक व्यतिरिक्त हेनरिक क्लासेन याने 23, नितीश कुमार रेड्डी याने नाबाद 21 आणि ट्रेव्हिस हेडने 20 धावांचं योगदान दिलं. या व्यतिरिक्त इतरांना 20 पार मजल मारता आली नाही. विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन याने निराशा केली. ईशान 13 धावा करुन माघारी परतला. अनिकेत वर्माने 3 धावा केल्या.
कामिंदु मेंडीस याला भोपळाही फोडता आला नाही. तर अखेरीस कर्णधार पॅट कमिन्स याने नाबाद 19 धावा करुन पराभवातील अंतर कमी केलं. गुजरातकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर गेराल्ड कोएत्झी आणि इशांत शर्मा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
गुजरातचा एकूण सातवा विजय
पहिल्या डावात काय झालं?
त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 224 धावा केल्या. गुजरातसाठी पहिल्या 4 फलंदाजांनी सर्वाधिक धावांचं योगदान देत शानदार बॅटिंग केली. शुबमन गिल याने सर्वाधिक 76 धावा केल्या. जोस बटलर याने 64 रन्स केल्या. साई सुदर्शन याने 48 धावांची खेळी केली. तर वॉशिंग्टन सुंदरने 21 रन्स जोडल्या. तर शाहरुख खान आणि राहुल तेवतिया या दोघांनी प्रत्येकी 6-6 धावा केल्या. तर हैदराबादसाठी जयदेव उनाडकट याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर पॅट कमिन्स आमि झीशान अन्सारी या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.