छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरगुती वादातून एका दाम्पत्याने छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या आयुष्याची दोर कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
भाऊराव पुंजाजी सोनाळे (वय ४५) आणि वैशाली भाऊराव सोनाळे (वय ४०) असं मयत दाम्पत्याची नावं आहेत. विशेष म्हणजे आपल्या पोटच्य दोन्ही मुलांना नांदेड येथे आजोळी पाठवून पती पत्नीनं आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेनंतर दोन्ही मुलं पोरकी झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भाऊराव सोनाळे आणि वैशाली सोनाळे हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील फुटाणा येथील रहिवासी होते. २० वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. घरी वडिलोपार्जित थोडी शेती आहे. पण, शेतीमध्ये चांगलं उत्पन्न मिळत नसल्यानं भाऊराव यांनी आपल्या कुटुंबियांना सोबत घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे कामाच्या शोधात गेले. तिथे त्यांना चांगलं काम मिळालं म्हणून ते दोघेजण तिथेच स्थायिक झाले. कामाच्या पैशातून त्यांनी जोगेश्वरी येथे जागा घेऊन घर देखील बांधलं होतं.
भाऊराव आणि वैशाली यांना दोन मुलं होती. दोघांची परिक्षा संपल्याने आई वडिलांनी दोन्ही मुलांना सुट्ट्यांमध्ये आजोळी नांदेडला पाठवलं होतं. १ मे रोजी दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. त्यानंतर मध्यरात्री वैशालीने राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं.
पत्नीच्या मृत्यूला आपल्याला दोषी ठरवतील, अशी भीती भाऊराव यांना होती. याच भीतीपोटी भाऊराव यांनी देखील २ मे रोजी मराठवाडा एक्सप्रेस रेल्वेसमोर उडी घेत जीवन संपवलं. आई-वडिलांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयाने दोन्ही पोरं पोरकी झाली असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.