उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगनाईजवळ एक भीषण हेलिकॉप्टर अपघात (Uttarkashi Helicopter Crash) झाला असून, या दुर्घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी ९ वाजता ही घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार हे हेलिकॉप्टर गंगोत्री धामच्या यात्रेला गेलेल्या भाविकांना घेऊन जात होते. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अपघातानंतर हेलिकॉप्टरचे अवशेष घटनास्थळी सापडले असून, अपघाताचे काही भयावह फोटोही समोर आले आहेत. हे हेलिकॉप्टर एका खासगी कंपनीचे (एरो ट्रान्स) होते आणि नाग मंदिराच्या जवळ भागीरथी नदीच्या काठावर कोसळले. या घटनेनंतर स्थानिक लोक, पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलिस दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि अन्य बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. मदतकार्य वेगाने सुरू असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी असल्यास त्यांना तातडीने वैद्यकीय मदत दिली जात आहे. (Uttarkashi Helicopter Crash)
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत प्रशासनाला त्वरित मदत आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘मृतांच्या आत्म्यांना शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखद प्रसंगातून सावरण्याची शक्ती लाभो,’ असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री धामी यांनी अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवत परिस्थितीवर लक्ष ठेवले असल्याचेही स्पष्ट केले आहे. अपघाताची सखोल चौकशी करण्यात येणार असून, सुरक्षा उपाययोजनांकडे गांभीर्याने पाहिले जाणार आहे. (Uttarkashi Helicopter Crash)
या घटनेमुळे गंगोत्री यात्रेतील भाविकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने भाविकांना सुरक्षिततेसाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत. हा अपघात भविष्यातील यात्रा व्यवस्थापनासाठी मोठा इशारा मानला जात आहे.