Tuesday, May 21, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : अबब..! जवारी मिरचीचा दर प्रतिक्विंटल १.२१ लाख

कोल्हापूर : अबब..! जवारी मिरचीचा दर प्रतिक्विंटल १.२१ लाख

ताजी बातमी ऑनलाईन टीम

यंदा अवकाळी पावसाने मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, यातून दर्जेदार जवारी मिरचीला मागणी वाढल्याने तब्बल 1 लाख 21 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर शनिवारी गडहिंग्लजमध्ये मिरची सौद्यावेळी मिळाला. आजवरचा हा उच्चांकी दर मिरचीने गाठला असून, अजूनही या दरात उसळी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात मिरचीकरिता प्रसिद्ध असलेल्या गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी झालेल्या मिरचीच्या सौद्यात सुळे (ता. आजरा) येथील शेतकरी अमृत कोकितकर यांच्या जवारी मिरचीला 1 लाख 21 हजार प्रतिक्विंटल असा विक्रमी दर मिळाला. व्यापारी ए. ए. आजरी यांनी बोली लावत या दराला मिरची खरेदी केली. शनिवारी 619 पोती मिरची आवक झाली.

7 हजारांपासून 1 लाख 21 हजारांपर्यंत किंमत मिळाली. चालू हंगामात मिरचीच्या 5 हजार 24 पोत्यांची आवक व विक्री झाली आहे. यावेळी व्यापारी रोहित मांडेकर, राजन जाधव, अरविंद आजरी, महेश मोर्ती, बी. पी. शहा, व्ही. के. चोथे, शिवानंद मुसळे, श्रीकांत यरटे, अमर मोर्ती, जब्बार बागवान, संजय खोत, सौदा विभागप्रमुख शैलेश देसाई उपस्थित होते.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून जवारी मिरचीच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चांगल्या गुणवत्तेच्या मिरचीला उच्चांकी दर मिळत आहे. प्रतिकिलो 300 रुपयांपासून सुरू झालेल्या दराने हजारचा टप्पा ओलांडला असून, दुसरीकडे अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना या पिकाने तारल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -