मित्राच्या हळदीसाठी मित्रांसमवेत चाललेल्या तरुणाचे एरंडगाव-सातारे रस्त्यावरील वळणावर गाडी नियंत्रणात न आल्याने विहिरीच्या कठड्याला धडकली. यात दुचाकीवरील सतीश रामकृष्ण जाधव (वय २३) या तरुणाचा मृत्यू झाला.
गोल्हेवाडी (ता. येवला) येथील रामकृष्ण जाधव यांची दोन्ही मुले चिचोंडी बुद्रुक (ता. येवला) येथील मामा गोवर्धन मढवई यांच्याकडे राहतात. सतीश हा येवला येथील गाडेकर गॅरेजमध्ये कामास होता. मंगळवारी (ता. ६) सायंकाळी सतीश रामकृष्ण जाधव मित्राच्या हळदीसाठी एरंडगाव येथील मित्रांसमवेत सातारेमार्गे सोमठाण देश येथे मित्रांसोबत दुचाकीवरून जात होता. मात्र मित्रांनी त्याला पावसाचे वातावरण असल्याने माघारी जाण्यास सांगितले.
त्याच वेळी वादळ सुटल्याने व धूळ उडाल्याने ऐन वळणावर सतीशच्या लक्षात वळण आले नाही. त्याची दुचाकी सरळ विहिरीच्या कठड्याला आदळली अन् तो विहिरीत पडला. सतीश घरी आला नाही, म्हणून सकाळी शोधाशोध सुरू केली असता, त्याची दुचाकी (एमएच १५, केए ०४८९) एरंडगाव-सातारे रस्त्यावर विहिरीजवळ आढळली. गळ टाकून खात्री केली असता तो विहिरीत आढळला. त्याला बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. येवला तालुका पोलिस तपास करीत आहेत.
तिसरी घटना
दरम्यान, मागील दहा वर्षांत याच पद्धतीने याच विहिरीत पडून बळी जाण्याची ही तिसरी घटना असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, या विहिरीला संरक्षण कठडे नसल्याने आणि बाजूला जाळी नसल्याने अशा घटना घडतात. त्यामुळे संबंधित मालकाने विहिरीला संरक्षण जाळी बसविणे गरजेचे आहे.