भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan War) यांच्यात तणाव वाढला आहे. दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाईला आंतरराष्ट्रीय स्थरावर भारताला पाठिंबा मिळतोय. रशिया, जपानने भारताला पाठिंबा जाहीर केला आहे. तर चीन आणि तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिली आहे. अमेरिका देखील भारताच्या बाजूने असल्याचं जाहीर केलं. तसेच भारत आणि पाकिस्तानच्या तणावात आमचा काय संबंध म्हणणाऱ्या अमेरिकेने 24 तासांत भूमिका बदलल्याचे दिसून येत आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी अमेरिकेने दाखवली आहे. पाकिस्तानला चर्चेसाठी मदत करु, असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिया यांनी केले आहे. काल भारत आणि पाकिस्तानच्या मध्यस्थीमध्ये आम्हाला रस नाही. भारत आणि पाकिस्तानच्या तणावात आमचा काय संबंध असं अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वॅन्स म्हणाले होते. मात्र आता मार्को रुबिया यांनी भारत-पाकला चर्चेसाठी मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिया काय म्हणाले?
भारत-पाक संघर्षात अमेरिकेची परस्परविरोधी वक्तव्ये दिसून येत आहे. दोन्ही देशांनी तणाव कमी करावा असं आवाहन अमेरिकेने केलं आहे. मार्को रुबिया यांनी भारत-पाकला चर्चेसाठी मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच पाकच्या लष्करप्रमुखांना आज अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी फोन केला. यावेळी ठोस चर्चा करुन संभाव्य धोका टाळण्याचं आवाहन परराष्ट्रमंत्री मार्को रुबिया यांनी केलं.
जे.डी. वॅन्स काय म्हणाले होते?
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वॅन्स यांनी आम्ही युद्धात पडणार नसल्याचं म्हटलं होतं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अतंर्गत प्रश्न आहे. वॅन्स यांनी यावेळेची अणू युद्ध होणार नाही हे देखील स्पष्ट केलं होतं. जेडी वॅन्स हे आंतरराष्ट्रीय संघर्षांपासून अमेरिेकनं अलिप्त राहण्याच्या भूमिकेचे समर्थक आहेत. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की आम्ही तेच करु शकतो, की या लोकांना तणाव कमी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणे. मात्र, आम्ही युद्दात सहभागी होणार नाही. ज्याच्याशी मुलभूतपणे आमचा काही संबंध नाही. अमेरिकेला याला नियंत्रित करण्यासंदर्भात काही देणं घेणं नाही. अमेरिका भारताला शस्त्र खाली ठेवा सांगू शकत नाही. त्याचवेळी पाकिस्तानला देखील शस्त्र खाली ठेवण्यास सांगू शकत नाही. आम्ही राजनैतिक मार्गानं या प्रकरणात पुढं जाण्याचा प्रयत्न करतोय, असं जेडी वॅन्स म्हणाले.