वडगाव (ता. कागल) च्या हद्दीत शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास शिवाजी बंडू शिंदे (वय 47 ) यांचा डोक्यात वार करून खून झाला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने मुरगूड पोलिसांच्या मदतीने आठ तासांत छडा लावला.
कांचनने चुलत दीर चंद्रकांत शिंदे याच्याशी असलेल्या अनैतिक संबंधातून त्याची मदत घेऊन हा खून केल्याचे समोर आले आहे.
शिवाजी शिंदे हा रात्री साडे नऊच्या सुमारास वडगावच्या चौकात कट्ट्यावर बसला होता. चुलत भाऊ चंद्रकांत धोंडीबा शिंदे हा शिवाजी यांना घेऊन मोटारसायकलने त्याच्या सासरी पिंपळगाव (ता. भुदरगड) येथे गेला. शिंदे यांची पत्नी कांचन हीसुद्धा माहेरी आली होती. यावेळी कांचन व चंद्रकांत यांनी महिला बचत गटाकडून घेतलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून शिवाजीच्या डोक्यात व चेहर्यावर टोणा मारून गंभीर जखमी केले. यात त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर दुचाकीने मृतदेह रस्त्यालगत टाकून अपघाती मृत्यूचा बनाव केल्याचे कांचन शिंदे व चंद्रकांत शिंदे यांनी कबूल केले. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली. हा खून आठ तासांत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, मुरगूड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, सहायक फौजदार प्रशांत गोजारे व पथकाने उघडकीस आणला.