टक्कल पडलेल्या लोकांसाठी, केस परत मिळवणे हे एक स्वप्न असते. पण कधीकधी हे स्वप्न जीवावर देखील बेतते. उत्तरप्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील पंकी पॉवर प्लांटमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून काम करणाऱ्या एका इंजिनिअरच्या बाबतीत असेच काहीसे घडले.
विनीत दुबे हा गोरखपूरचा रहिवासी होता आणि त्याने अलिकडेच एचबीटीआय कानपूर येथून पीएचडी पूर्ण केली होती.
विनीतच्या कुटुंबातील सदस्यांच्या मते, विनीत नेहमीच त्याच्या लूकबद्दल जागरूक होता. त्याचे टक्कल पडण्याचे प्रमाण वाढत चालले होते आणि सोशल मीडियावर ‘केस प्रत्यारोपणाच्याजाहिरातींमुळे तो प्रभावित झाला होता. एवढेच नाही तर एका डॉक्टरने त्याला फोनवरून त्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात आणण्याची ऑफर दिली. विनीतची पत्नी जया दुबे होळीच्या दिवशी तिच्या दोन्ही मुलांसह गोंडा येथील तिच्या माहेरी गेली होती.
दरम्यान, १२ मार्च रोजी विनीतने कानपूरमधील कल्याणपूर येथील एका क्लिनिकमधील डॉक्टरांकडून केस प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. विनीतने डॉक्टरांशी संपर्क साधला. त्याची केस प्रत्यारोपण प्रक्रिया सुरू झाली. जयाच्या मते, केस प्रत्यारोपणादरम्यान माझ्या पतीचा चेहरा सुजला होता. डॉक्टरांनी स्वतः मला फोन करून सांगितले की विनीतची प्रकृती बिघडली आहे. पण डॉक्टरांनी त्याची ओळख लपवली होती. ते दुसऱ्याच नंबरवरून फोन करत होते.
त्यानंतर डॉक्टरांनी विनीतला दुसऱ्या रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना सर्वोदय नगरमधील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिथे उपचार सुरू केले, पण संसर्ग इतका पसरला होता की १५ मार्च रोजी विनीतचा मृत्यू झाला.
विनीतच्या मृत्यूने जया खूप दुःखी झाली. जेव्हा ती डॉक्टरांशी बोलली तेव्हा डॉक्टरांनी कबूल केले की केस प्रत्यारोपण योग्यरित्या झाले नाही आणि येथूनच संसर्ग सुरू झाला. या धक्कादायक सत्यामुळे जया न्यायासाठी उभी राहिली. तिने मुख्यमंत्र्यांच्या जनसुनावणी पोर्टलवर तक्रार दाखल केली आणि पुरावा म्हणून विनीतचे व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल देखील सादर केले. जयाने सांगितले की, माझ्या पतीला त्याचे आयुष्य खूप आवडायचे. त्याने नुकतीच पीएचडी पूर्ण केली होती आणि आपल्या मुलांना वाढवण्याची त्याची अनेक स्वप्ने होती. पण डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ती सर्व स्वप्ने एकाच झटक्यात उद्ध्वस्त झाली आणि तो जिवाला मुकला.