बीसीसीआयने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) उर्वरित सामन्यांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना 17 मे पासून सुरुवात होणार आहे. त्याआधी बीसीसीआयने 9 मे रोजी भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य स्थितीमुळे आयपीएलचा 18 वा हंगाम एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला होता. तर त्याआधी 8 मे रोजी तांत्रिक अडचणीमुळे पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स धर्मशाळेत आयोजित करण्यात आलेला सामना स्थगित करण्यात आला. पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून पंजाब विरुद्ध दिल्ली सुरु असलेला सामना थांबवण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यानंतरही दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला नव्हता. त्यामुळे हा सामना पुन्हा खेळवण्यात येणार की नाही? याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. याबाबत नवी अपडेट समोर आली आहे. बीसीसीआयने सुधारित वेळापत्रकात पंजाब-दिल्ली सामन्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
पंजाब-दिल्ली सामन्याबाबत निर्णय काय?
धरमशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये 8 मे रोजी पंजाब विरुद्ध दिल्ली सामना आयोजित करण्यात आला होता. दिल्लीने या सामन्यात खेळ स्थगित होईपर्यंत 10.1 ओव्हमध्ये 1 विकेट गमावून 122 धावा केल्या होत्या. ओपनर प्रभसिमरन सिंह याने नाबाद 50 धावा केल्या होत्या. तर तर प्रियांश आर्या याने 34 बॉलमध्ये 79 रन्स केल्या. त्यामुळे पंजाब त्या सामन्यात भक्कम स्थितीत होती. मात्र सामना स्थगित करण्यात आला. आता हा सामना पुन्हा खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे पंजाबसाठी हा मोठा झटका समजला जात आहे. कारण, पंजाब या सामन्यात चांगल्या स्थितीत होती. मात्र आता हा सामना पुन्हा नव्याने होणार आहे.
पंजाब-दिल्ली सामना कुठे?
पंजाब विरुद्ध दिल्ली हा सामना आता नव्या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयकडून उर्वरित 17 सामन्यांचं आयोजन हे 6 शहरांमध्ये करण्यात आलं आहे. त्या 6 शहरांमध्ये धरमशाळाचा समावेश नाही. दोन्ही संघात 24 मे रोजी जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये हा सामना आयोजित करण्यात आला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, पंजाब किंग्सने 11 सामने खेळले आहेत. पंजाबने 7 सामने जिंकले आहेत. पंजाब 14 गुणांसह पॉइंटस् टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. पंजाबचा एक सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. तर दिल्लीने अप्रितम सुरुवात केली. मात्र त्यानंतर दिल्ली विजयाच्या ट्रॅकवरुन घसरली. सलग 4 सामने जिंकून धमाकेदार सुरुवात करणाऱ्या दिल्लीला अखेरच्या टप्प्यात पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीने 11 पैकी 6 सामने जिंकले आहेत. दिल्ली 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. दिल्लीचाही एक सामना पावसामुळे वाया गेला.
पंजाबचं नशीबच फुटकं
दरम्यान पंजाबला या हंगामात दुसर्यांदा अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. पंजाबला याआधी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. पंजाबने पहिल्या डावात 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 201 धावा केल्या होत्या. त्यानंतर केकेआरने 1 ओव्हरमध्ये 7 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसाने एन्ट्री घेतल्याने खेळ थांबवण्यात आला होता. मात्र बराच वेळ प्रतिक्षा करुनही खेळ पुन्हा सुरु होण्याची चिन्हं दिसत नव्हती. त्यामुळे सामना रद्द करण्यात आल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात आला.