पळशी (ता. कोरेगाव) येथील विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झालेल्या मायलेकींपैकी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची नोंद येथील पोलिसात आकस्मित मृत्यू अशी झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पळशी येथे शनिवारी (ता.१०) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घराच्या पाठीमागे असलेल्या नळाचे पाणी भरण्यासाठी लावलेली विजेची मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या अर्चना सोमनाथ भंडलकर (वय ४५) यांना विजेचा धक्का बसला. त्यामुळे त्या मोठ्याने ओरडल्याने त्यांची मुलगी गायत्री (वय १५) पळत गेली व वीज पुरवठा बंद न करता तिने आईच्या हातातील वीज वाहिनी ओढून घेतल्याने त्याचा तिलाही जोराचा धक्का बसला.
त्यामुळे तीही ओरडून खाली जमिनीवर पडली. तिचा आवाज ऐकून तिचे वडील सोमनाथ भंडलकर हे पळत घटनास्थळी गेले. त्यांनी तातडीने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सुरेश पिसाळ यांच्या चार चाकी वाहनातून जखमी अर्चना व गायत्री यांना कोरेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी मुलगी गायत्री हिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. गंभीर जखमी असलेल्या अर्चना यांना सातारा येथील सर्वसाधारण रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास हवालदार जोतिराम शिंदे करत आहेत.