नागपूपमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजोबांच्या गावी गेलेल्या ९ वर्षीय उत्कर्ष सेलोटेचा कुलरचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्याच्या फेगड येथे ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. कुही तालुक्यातील आंबोरा येथील उत्कर्ष हा काही दिवसापूर्वी शाळेला सुट्टी लागल्यामुळे त्याच्या आजोबांच्या गावी येथे आला होता. सकाळी घरात खेळत असताना अचानक त्याला कुलरचा शॉक लागला या त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
विजेच्या शॉक लागल्यामुळे उत्कर्ष दूरवर फेकला गेला. त्याला लागलीच वेलतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेमुळे गावात मात्र शोककळा पसरली आहे.
शहापूरमध्ये हृदयद्रावक घटना
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे देखील एक अतिशय हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. ती म्हणजे, आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास कसारा बायपासजवळ शहापूर येथे एका घराला लागलेल्या आगीत एक लहान मुलाचा मृत्यू झाला. त्याच रस्त्याने क्रिकेट खेळण्यासाठी जाणाऱ्या मुलांनी घराला आग लागल्याचं लक्षात येताच आग विझवण्यासाठी पुढे धावले. मात्र, एक लहान मुलगा घरात अडकलेला एकाच्या लक्षात येताच त्याने लगेच घरात घुसून मुलाला बाहेर काढले आणि उपचारासाठी रूग्णालयायात पाठवले. मात्र रूग्णालयात घेऊन जात असतानाच त्या मुलाचे प्राणज्योत मालवली.
नेमकं काय घडलं?
आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास शहापूर तालुक्यातील कसारा बायपासजवळ वाशेळा गावाच्या रस्त्यालगत दत्ता बुले यांच्या घराला अचानक आग लागली. त्याच रस्त्याने क्रिकेट खेळण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या मुलांच्या लक्षात येताच त्या मुलं घराला लागलेली आग विझवण्यासाठी थांबले. बाजूला पाणी टंचाई असल्याने साठवून ठेवलेल्या पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. आग विझवत असताना एका मुलाच्या लक्षात आले की आत एक लहान मुलगा आगीच्या विळख्यात अडकला आहे. क्षणाचाही विलंब न करता लगेच लहान मुलाला बाहेर काढले आणि उपचारासाठी रूग्णालयात पाठवले. मात्र रूग्णालयात घेऊन जात असतानाच रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. कृष्णा बुले असं मृत मुलाचं नाव असून तो साडेतीन वर्षांचा होता. खासगी टँकरच्या साहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते पण संपूर्ण घर जळून खाक झालं.