आडगाव (ता. खेड) येथील एका 17 वर्षीय मुलीला साप चावल्याची घटना शनिवारी (ता.17) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे. या मुलीचा सर्पदंश झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे.
तिच्या निधनाने आई-वडिलांनी टाहो फोडला आहे.
प्रांजल तुकाराम गोपाळे (वय १७, रा. आडगाव, ता. खेड, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजलला सकाळी नऊच्या सुमारास सर्पदंश झाला. तिला पाईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उपचारांसाठी त्वरित आणले होते. मात्र तेथे सर्पदंशाची लस व डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपचारासाठी चांडोली रुग्णालय पाठविण्यात आले. मात्र त्या ठिकाणी देखील लस उपलब्ध नसल्याने प्राथमिक उपचार करण्यात आले.
दरम्यान, प्रांजलला पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिका करून यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी रुग्णवाहिकेत कोणताही हॉस्पिटलचा स्टाफ नव्हता. मात्र, प्रांजलचा चिखली येथे रुग्णवाहिकेतच दुर्दैवी मृत्यू झाला. तर प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेत उपचार न मिळाल्याने प्रांजलचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.