राज्य परिवहन मंडळाची बसचा महाड जवळ भीषण अपघात झाला आहे. पुणे स्वारगेट डेपोच्या बस क्रमांक एम.एच14 बी.टी 4775 या विन्हेरे स्वारगेट बसला स्वारगेटच्या दिशेने येताना शनिवार 17 मे 2025 रोजी दुपारच्या सुमारास महाड तालुक्यातील करंजाडी गावचे हद्दीत आल्यानंतर चालकाला रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न आल्याने बसवरील नियंत्रण सुटून अपघात होऊन ती पलटी झाल्याची घटना घडली असल्याचं समोर आलं आहे.
अपघातावेळी बसमधून एकूण 15 प्रवासी प्रवास करीत होते त्यापैकी निशी सुनील घाडगे वय 9, राहणार रुपवली महाड, सुजाता सुरेश यादव, सुरेश यादव,धनश्री सुरेश यादव सर्व राहणार विन्हेरे,महाड, कम्रूनिसा अहमद देवळेकर,राहणार भोमजाई, महाड यांच्यासह चालक मुरलीधर दिगंबर पोफळे राहणार भेकरेनगर,पुणे आणि वाहक जयश्री बाबू वाघमारे, राहणार सिंहगडरोड, पुणे असे सातजण या अपघातात जखमी झाले आहेत. सर्व जखमीना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोईफोडे यांनी दिली आहे.
या आधीही महाडजवळील वरंध घाटात एसटी बसचा अपघात झाला होता. या अपघातात १५ ते २० प्रवासी जखमी झाले. भोर-महाड मार्गावरील या अपघातात बसचा ब्रेक निकामी झाल्याने ती ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली होती. या सततच्या अपघातावर योग्य तोडगा काढण्यात यावा याबाबत प्रवाशांनी मत व्यक्त केलं आहे.