आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 61 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. लखनौने हैदराबादला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादने हे आव्हान 10 बॉलआधी आणि 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. हैदराबादने 18.2 ओव्हरमध्ये विजयी आव्हान पूर्ण केलं. हैदराबादचा हा या मोसमातील 12 व्या सामन्यातील चौथा विजय ठरला. तसेच हैदराबादने विजय मिळवत लखनौला या स्पर्धेतून बाहेर केलं. लखनौ या स्पर्धेतून बाहेर पडणारी पाचवी टीम ठरली. त्यामुळे आता प्लेऑफमधील उर्वरित एका जागेसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे.
ओपनर अभिषेक शर्मा याने हैदराबादच्या विजयात सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. अभिषेकने 20 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 4 फोरसह 59 रन्स केल्या. अर्थव तायडे याने 13 रन्स केल्या. विकेटकीपर ईशान किशनने 28 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 35 धावांचं योगदान दिलं. हेनरिक क्लासेन याने 28 बॉलमध्ये 47 रन्स केल्या. कामिंदु मेंडीस 32 रन्स करुन रिटायर्ड हर्ट झाला. तर अनिकेत वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी प्रत्येकी नाबाद 5-5 धावा करत हैदराबादला विजयापर्यंत पोहचवलं. लखनौकडून दिग्वेश राठी याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर विलियम ओरुर्क आणि शार्दूल ठाकुर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
पहिल्या डावात काय झालं?
त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं. लखनौने 7 विकेट्स गमावून 205 धावा केल्या. लखनौसाठी मिचेल मार्श आणि एडन मारक्रम या सलामी जोडीने सर्वाधिक धावा केल्या. तर मधल्या फळीत निकोलस पूरन याने निर्णायक खेळी केली. मार्शने 39 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 6 फोरसह 65 रन्स केल्या. तर एडन मारक्रम याने 38 बॉलमध्ये 4 फोर आणि तितक्याच सिक्ससह 61 रन्स केल्या. तर निकोलस पूरन याने 26 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 45 धावा केल्या. तर इतरांना दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही. हैदराबादसाठी एशान मलिंगा याने दोघांना मैदानाबाहेर पाठवलं. तर हर्ष दुबे आणि हर्षल पटेल या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
हैदराबादचा विजय, लखनौ आऊट
मुंबई-दिल्ली सामन्याकडे लक्ष
दरम्यान आता 21 मे रोजी मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात होणाऱ्या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील 13 वा सामना असणार आहे. मुंबईच्या खात्यात 14 आणि दिल्लीच्या खात्यात 13 पॉइंट्स आहेत. त्यामुळे मुंबईने हा सामना जिंकला तर ते प्लेऑफसाठी क्वालिफाय करतील. मात्र दिल्लीला मुंबई आणि त्यानंतर 24 मे रोजी पंजाब विरुद्ध अशा दोन्ही सामन्यांमध्ये जिंकावं लागेल. त्यामुळे आता एका जागेसाठी 2 संघात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.