पैठण शहरापासूनजवळ असलेल्या शहागड फाट्यावर वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांना जेवणातून विषबाधा होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. १३ जण बाधित झाल्याने त्यांच्यावर पैठण येथे शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या घटनेत मृत्यू झालेल्या मजूर महिलेचे नाव ललिता प्रेमलाल पालविया (वय ३३, मध्यप्रदेश) असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पैठण शहरालगत असलेल्या वीट भट्टीवर मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय महिला-पुरुष कामगार असून या मजुरांनी आठवडे बाजारातून नेहमीप्रमाणे चिकन खरेदी करून जेवण बनवले होते. उरलेले शिळे अन्न या मजुरांनी खाल्ल्यामुळे रविवारी त्यांना अचानक मळमळ, उलटी, चक्कर येणे असा त्रास सुरू झाला. त्यामुळे मजुरांमध्ये एकच खळबळ उडाली.
दरम्यान, मजुरांना तातडीने उपचारासाठी पैठण शहरातील शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना ललिता पालविया या महिलेचा मृत्यू झाला, तर गंगाकिशोर ठाकरे (२४, रा. गाव दोमालिया, उत्तर प्रदेश), मंगल ठाकरे (४४), सुखराई ठाकरे (४२), सीमा ठाकरे (१७), दीपक ठाकरे (१५), संजय ठाकरे (१२), विमलाबाई गौतम (३८), संगीता गौतम (१८), सलिता गौतम (१९), फुलमती ठाकरे, शिवांगी प्रेम पालवी (७), राजपाल गौतम (११), राज गौतम (१४, सर्व रा. मध्य प्रदेश) यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
यासंदर्भात पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी घटनेची नोंद केली आहे. पुढील तपास सुधीर ओव्हळ हे करीत आहे.