येथील हनुमाननगर परिसरात प्रेमाचे नाटक करत महिलेची फसवणुक करून धमकी देवून तिच्यावर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
महेश संतराम कांबळे (वय ३८) आणि अर्चना महेश कांबळे (वय ३५ दोघे रा. कबनूर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद संबंधित पिडीत महिलेने दिली आहे. दरम्यान याप्रकरणी महेश कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, महेश कांबळे हा पिडीत महिलेच्या पतीचा मित्र आहे. त्यातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत महेश याने पिडितेशी प्रेमाचे नाटक केले. फिरण्याच्या निमित्ताने दोघांमध्ये झालेले संभाषण महेशने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतले. हे रेकॉर्डिंग त्याने अर्चनाच्या मोबाईलवर पाठवत दोघांनी मिळून ही ऑडिओ क्लिप पिडितेच्या पतीसह नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली. त्याचबरोबर महेशने १६ जून २०२४ ते ६ जानेवारी २०२५ या कालावधीत येथील एका कारखान्यात वेळोवेळी पिडितेशी तिच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. शिवाय कबनुरातील एका सोशल मिडीया ग्रुपवर पिडितेच्या कुटुंबाची बदनामी करणारी पोस्टही टाकली. यासंदर्भात पिडितेने दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महेश व अर्चना कांबळे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.