करूळ घाटात बुधवारी सकाळी कंटेनरने अचानक पेट घेतला. यात कंटेनरचे मोठे नुकसान झाले. वेळीच उडी मारल्याने चालक बचावला. ही घटना बुधवारी सकाळी आठ वाजता घडली. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, इसूब उंबर शेख (वय २६, रा.वायफळ, ता. जत, जि. सांगली) हा चालक कंटेनर घेऊन करूळघाट मार्गे कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. कोल्हापूर-वैभववाडी मार्गावर करूळ घाटमार्गे गगनबावडापासून ४ कि.मी. अंतरावर येताच कंटेनरने अचानक पेट घेतला. चालकाच्या लक्षात येताच त्याने खाली उडी मारली. यात कंटेनर जळून खाक झाला. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
हा कंटेनर बुलडोझर घेऊन निघाला होता. या घटनेची माहिती मिळताच गगनबावडा व वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आर.बी. वेल्हाळ कन्स्ट्रक्शनने तत्काळ पाण्याचे टँकर पाठवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. याची नोंद वैभववाडी पोलिस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.