कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला पावसाने (Heavy Rain) अक्षरश: झोडपलं आहे. काल (गुरुवारी, ता,12) सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार (Heavy Rain) पावसाने हजेरी लावली.
काही वेळातच पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं दिसून आलं. काल झालेल्या या पावसामध्ये एका शाळकरी मुलाचा मृत्यू (Death) झाला आहे. कोल्हापूर शहराजवळ सरनोबतवाडी येथे शाळकरी मुलगा घरी जात असताना ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने, पाण्याला प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचं बचाव पथ कालपासून या शाळकरी मुलाचा शोध घेत आहेत. या मुलाचा मृतदेह सापडला असल्याची माहिती समोर आली आहे.
कोल्हापुरात ओढ्यातून वाहून गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. काल सायंकाळी पाचच्या सुमारास ओढा ओलांडत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने शाळकरी मुलगा वाहून गेला होता. अमन भालदार असं या शाळकरी विद्यार्थ्यांचे नाव आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने शोध मोहीम राबवत या विद्यार्थ्यांच्या मृतदेहाचा शोध घेतला आहे. सरनोबतवाडी मणेर मळा येथील ओढ्यामध्ये हा शाळकरी मुलगा वाहून गेला होता. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
15 दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापुरात जोरदार पुनरागमन
तब्बल 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने गुरुवारी कोल्हापुरात जोरदार पुनरागमन केलं. सकाळी हलक्या सरीनंतर वातावरणात उष्णता जाणवत असतानाच, सायंकाळी अचानक मेघगर्जनेसह तुफान पावसाने कोल्हापुरात हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच कोल्हापुरासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला होता. सुमारे एक तास पडलेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे शहराच्या सखल भागांमध्ये पाणी साचलं. राजारामपुरी, दुधाळी परिसर, सरनाईक वसाहत, परीख पूल, पाचगाव यांसारख्या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. परिणामी, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.
एका तरूणाला वाचवण्यात यश
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील गोकुळ शिरगाव परिसरात ओढ्यावर आलेल्या पाण्यामुळे वाहतूक मंदावली. याच ठिकाणी ओढ्याचं पाणी पाहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा तोल गेला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. स्थानिकांनी दोऱ्याच्या साहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा प्रयत्न अपयशी ठरला, मात्र तरुणाने प्रसंगावधान राखत पुढे गेलेल्या झाडाला पकडलं. स्थानिकांनी पुढे धाव घेत त्याचा यशस्वी रेस्क्यू केला.
जनजीवन विस्कळीत
या मुसळधार पावसामुळे शाळा व कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. सखल भागात गुडघाभर पाणी साचलं असून, घरात व आस्थापनांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. शहरात वाहतूक खोळंबली असून, अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅमची स्थिती निर्माण झाली. राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहावं, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.