पंचगंगा नदीतील पाणी पातळी कमी न झाल्याने अद्याप कोल्हापूर पद्धतीच्या चार बंधाऱ्यावरील बरगे निघालेलेच नाहीत. मात्र राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी करणे गरजेचे असल्याने अखेर जलसंपदा विभागाने राधानगरी धरणातून गुरुवारी (दि.१२) दुपारपासून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.
दरम्यान, धरणात मान्सून बरसण्यापूर्वीच साडेचार टीएमसी एवढा पाणीसाठा असून त्यापैकी दीड हजार क्युसेकने किमान अडीच टीएमसी पाण्याचा विसर्ग करावा लागतो. त्यामुळे सुरवातीला 400 क्युसेकने तर गुरुवारी रात्री 8 ते मध्यरात्री 12 पर्यंत 1500 क्युसेक पर्यंत विसर्ग वाढविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. अद्याप राजाराम बंधारा, सुर्वे बंधारा, तेरवाड आणि शिरोळ बंधारा या चार बंधाऱ्यांचे बरगे अद्याप पूर्णपणे निघालेले नाहीत.
गुरुवारी (दि.१२) दुपारी सोडलेले पाणी राजाराम बंधाऱ्यापर्यंत पोहोचायला एक दिवस तर शिरोळ तालुक्यातील बंधाऱ्यापर्यंत पोहोचायला दीड ते दोन दिवस लागतील. तोपर्यंत जलसंपदा विभागाला युद्ध पातळीवर उर्वरित बरगे काढावे लागणार होते. मात्र, गुरुवारी दुपारनंतर कोसळलेल्या धुवाँधार पावसाने बरगे काढण्याचे काम आव्हानात्मक बनले आहे.
दरवर्षी मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज घेत राधानगरी धरणातून दोन टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवून उर्वरित पाण्याचा विसर्ग केला जातो. मात्र यावर्षी बंधाऱ्यावरील बरगे काढण्यात अडथळे आल्याने धरणातील विसर्ग नाईलाजाने थांबवावा लागला.
मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीसाठी पाण्याची गरज संपल्याने नदीतून पाण्याचा उपसा झाला नाही. साखर कारखाने लवकर बंद झाल्याने औद्योगिक पाणी वापरही कमी झाला. शिवाय जोरदार पावसाने ओढे -नाले भरून थेट नदीत वाहिले आणि या सर्व कारणामुळे नदीतील पाणी पातळी जैसे थे राहिली. परिणामी कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यावरील बरगे पूर्णपणे काढण्यात अडचणी आल्या आहेत.
आता तर राधानगरी धरणातून पाण्याच्या विसर्गा बरोबरच पावसाच्या पाण्याने ही नदीची पाणी पातळी वाढू लागल्याने सदरच्या चार बंधाऱ्यातील उर्वरित बरगे बंधाऱ्यातच राहण्याची शक्यता आहे.






