एका तरुणाने फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह शेतात पुरल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधील मंड्या मध्ये समोर आली आहे. पोलिसांनी मंगळवारी आरोपी पुनीत गौडाला अटक केली.
अवघ्या दोन दिवसांच्या चॅटिंगनंतर दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला. भेटीदरम्यान दोघांत वाद झाला आणि तरुणाने महिलेची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव प्रीती सुंदरेश असे आहे, जी हसन जिल्ह्यातील रहिवासी होती आणि विवाहित होती. महिलेला दोन मुले देखील आहेत. आरोपी पुनीत गौडा हा मंड्या जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि अभियांत्रिकी पदवीधर आहे, पण तो सध्या बेरोजगार आहे. दोघांची फेसबुकवर ओळख झाली आणि अवघ्या दोन दिवसांच्या चॅटिंग नंतर त्यांनी भेटण्याचा निर्णय घेतला होत.
फेसबुकवर बोलल्यानंतर दोघांनी भेटण्याची आणि शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. शनिवारी प्रीती आपल्या कुटुंबियांना माहित न होता पुनीतसोबत त्याच्या कारमध्ये फिरायला गेली. हासनजवळील एका निर्जन ठिकाणी दोघांनी काही खाजगी क्षण घालवले, त्यानंतर त्यांच्यात जोरदार वाद झाला. या वादादरम्यान पुनीतने रागाच्या भरात प्रीतीवर हल्ला केला, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हत्येनंतर आरोपीने प्रीतीचा मृतदेह त्याच्या गाडीत ठेवला आणि मंड्या जिल्ह्यातील केआर पेट तालुक्यातील कट्टुरघट्टा जंगलाजवळील त्याच्या शेतात पुरला. प्रीतीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबाने शनिवारी हसनमध्ये दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि फेसबुक मेसेजद्वारे पुनीतपर्यंत पोहोचले.
पोलिसांनी सांगितले की चौकशीदरम्यान आरोपीने कबूल केले आहे की, प्रीतीने त्याला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पैसे देऊ केले होते, परंतु त्याने नकार दिल्याने दोघांमध्ये भांडण झाले, ज्याचे रूपांतर शेवटी हत्येत झाले. बुधवारी मंड्या पोलिसांनी आरोपीला त्याने मृतदेह पुरलेल्या ठिकाणी नेले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे आणि प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.