पश्चिम बंगाल पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. कोलकात्यातील एका लॉ कॉलेजमधून ही संतापजनक घटना समोर आली आहे. टीएमसीच्या एका विद्यार्थी नेत्याने आपल्या मित्रांसह लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला आहे. त्यामुळे कोलकात्यात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, मनोजित मिश्रा नावाच्या तृणमूल काँग्रेसशी संबंधित असलेल्या विद्यार्थी नेत्याने पीडित विद्यार्थीनीला जीएस बनवण्याचे आमिष दाखवून भेटण्यासाठी बोलावले होते. विद्यार्थी नेता लॉ कॉलेजमध्ये तात्पुरता कर्मचारी आहे. त्याने पीडित विद्यार्थीनीला कॉलेजच्या युनियन रूममध्ये बोलावले. त्यावेळी त्याच्यासोबत इतर दोन मित्रही होते.
विद्यार्थिनीकडे लग्नाची मागणी
युनियन रूममध्ये आरोपीने विद्यार्थिनीकडे लग्नाची मागणी केली, त्यावेळी विद्यार्थिनीने नकार दिला आणि ती बाहेर जाऊ लागली. त्यावेळी विद्यार्थी नेत्याच्या मित्रांनी मुख्य गेट बंद केला. पीडितेने आरडाओरडा करण्यापूर्वीच आरोपीने तिला मुख्य गेटजवळील गार्डरूममध्ये नेले. आरोपी विद्यार्थ्याने आणि त्याच्या दोन मित्रांनी तिला सुरक्षा रक्षकाच्या खोलीत बंद केले व तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
साडेतीन तास सामूहिक बलात्कार
पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, 25 जून रोजी संध्याकाळी 7.30 ते रात्री 11 वाजेपर्यंत पीडितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर आरोपींनी तिला तोंड बंद ठेवण्याची धमकीही दिली. त्यामुळे आता या गंभीर घटनेनंतर कोलकात्यातील महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे.
कायदा काय म्हणतो?
कायद्यानुसार सामूहिक बलात्काराच्या बाबतीत, घटनेदरम्यान सर्वांनी सक्रिय भूमिका बजावली, धमकी दिली किंवा व्हिडिओ बनवला तर सर्वांना समान दोषी मानले जाईल. कलम 70 अंतर्गत सामूहिक बलात्कारासाठी किमान शिक्षा 20 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा आहे, जी जन्मठेपेपर्यंत वाढवली जाऊ शकते, तसेच आरोपींना दंड देखील ठोठावला जाऊ शकतो.