भारत आणि इंग्लंड अंडर 19 संघांमध्ये पाच सामन्यांची वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिला वनडे सामना काउंटीच्या होवे मैदानात सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने या सामन्यात भेदक गोलंदाजी केली आणि इंग्लंडच्या फलंदाजांना डोकं वर काढू दिलं नाही. इंग्लंडचा संपूर्ण संघ 42.2 षटकात सर्वबाद होत 174 धावा करून तंबूत परतला. इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान गाठण्यासाठी भारताचं भविष्य असलेल्या आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनी सुरुवात केली. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या नैसर्गिक स्वभावाप्रमाणे फलंदाजी केली. यामुळे इंग्लंडचे गोलंदाज पुरते हैराण झाले होते. स्ट्राईक मिळाल्यानंतर पहिला चेंडू निर्धाव गेला आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारत आपला आक्रमक अंदाज दाखवला. त्यानंतर वैभव सूर्यवंशीने आक्रमक पवित्रा घेतला आणि पाच षटकार आणि 3 चौकार ठोकले.
वैभव सूर्यवंशीने या सामन्यात फक्त 19 चेंडूंचा सामना केला पण 252.63 च्या स्ट्राईक रेटने 48 धावा केल्या. त्यात त्याने इंग्लंडच्या एका गोलंदाजाला एकाच षटकात तीन षटकार मारले. त्याचं अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. रायपी अलबर्टच्या गोलंदाजीवर तझीम चौड्री अलीने त्याला झेल घेतला. वैभव सूर्यवंशीने आयपीएल सारखाच आक्रमक अंदाज या सामन्यात दाखवला. त्यामुळे त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे चाहता वर्गही वाढला आहे. कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनी पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली.
इंग्लंडच्या भूमीवर वैभव सूर्यवंशीची खेळण्याची पहिलीच वेळ होती. यापूर्वी आशियाई देशात त्याने भारतासाठी फलंदाजी केली होती. मात्र आशियाबाहेर खेळत दमदार कामगिरीचं दर्शन घडवलं. त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ असाच सुरु राहिला तर कमी वयातच भारताच्या वरिष्ठ संघात जागा मिळवू शकतो. पण त्याला यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. आता उर्वरित चार वनडे सामन्यात कशी फलंदाजी करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दुसरा वनडे सामना 30 जूनला होणार आहे.