अवघ्या महाराष्ट्राला पंढरीच्या वारीचे (Pandharichi wari) वेध लागले असून लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी शेकडो दिंड्या पंढरीकडे चालत आहेत. पाऊले चालती पंढरीची वाट म्हणत ऊन, पाऊस अन् वाऱ्यातही माऊली.. माऊली… नाम जपत वारकऱ्यांची पाऊले पंढरपूरकडे जात आहेत. गावखेड्यातील वारकरी, महाराज, हभप आणि साधू-संताकडूनही वारीच्या आठवणी जागवल्या जात आहेत. मात्र, अकोला (Akola) जिल्ह्यातून एक दु:खद वार्ता समोर आली आहे. जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील जेष्ठ संत हभप नारायण महाराज तराळे यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं, मृत्यूसमयी ते 98 वर्षांचे होते.
हभप नारायण महाराज तराळे यांनी बाळापूर तालुक्यातल्या व्याळा गावी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी वारकरी संप्रदायाची धुरा खांद्यावर घेतली. त्यांनी 60 वर्ष सलगपणे पंढरीची वारी केलीय. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर त्यांनी कीर्तनातून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत सेवा बजावली. वारकरी संप्रदायातील त्यांचे ‘विरह अभंग’ खूप प्रसिद्ध आहेत. दरम्यान, उद्या रविवार सकाळी 10 वाजता त्यांच्यावर व्याळा या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रभरातून उद्या त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वारकरी मंडळी उपस्थित राहणार आहे.