आपल्या ४ वर्षीय नातवाला वाचवण्यासाठी एका आजोबांनी थेट बिबट्याची पंगा घेतलाय. नातवाला जबड्यात पकडून घेऊन जाणाऱ्या बिबट्यावर झडप घेत आजोबांनी नातवाची सुटका केलीये.
ही थरारक घटना घडली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात. या घटनेची आणि हिंमतीची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.
कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात आहेर कुटुंब वास्तव्यास आहे. आई कामावर निघाली असता कुणाल अजय आहेर हा ४ वर्षीय चिमुकला तिच्यापाठोपाठ घराबाहेर आला. त्याचवेळी बाजूला उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने कुणालवर झडप घातली आणि त्याला जबड्यात पकडून उसाच्या शेतात घेऊन गेला. दरम्यान चिमुकल्याने जोराने आजोबांना आवाज दिला असता आजोबा मच्छिंद्र आहेर घराबाहेर आले. नातवासोबत काहीतरी विपरीत घडल्याचा अंदाज येताच आजोबांनी उसाच्या शेतात धाव घेतली.
लाडक्या नातवाला बिबट्याच्या जबड्यात बघून आजोबांनी कसलीही परवा न करता थेट बिबट्यावर झडप घेत त्याच्याशी दोन हात केले. आजोबांचा जोरदार प्रतिकार बघून बिबट्याही हतबल झाला आणि त्याने नातवाला तिथेच सोडून धूम ठोकली. जखमी झालेल्या चिमुकल्या कुणालावर रुग्णालयात उपचार सुरू असून आजोबांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होतंय. माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. परिसरात पिंजरा लावण्यात आला असून बिबट्याचा शोध सुरू आहे. सध्या कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर असून वन विभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.