मेन्स टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. शुबमन गिल कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. मात्र वूमन्स टीम इंडियाने कमाल केली. वूमन्स टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यातील टी 20i सीरिजची सुरुवात दणक्यात केली. स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडचा 97 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या धमाकेदार विजयामुळे महिला ब्रिगेडचा विश्वास चांगलाच दुणावलेला आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे दुसरा सामना जिंकून मालिकेतील आघाडी आणखी भक्कम करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडचा विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे.
उभयसंघात दुसरा टी 20i सामना 1 जुलै रोजी काउंटी ग्राउंड, ब्रिस्टोल इथे आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला रात्री 11 वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरुवात होणार आहे. स्मृती मंधाना टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर नॅट सायव्हर ब्रँट हीच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.
इंग्लंडसमोर दुहेरी आव्हान
इंग्लंडला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. भारताने इंग्लंडला त्यांच्याच घरात 97 धावांच्या ऐतिहासिक फरकाने पराभूत केलं. इंग्लंडचा हा टी 20i क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव ठरला. त्यामुळे आता इंग्लंडसमोर दुसऱ्या सामन्यात कमबॅक करण्यासह भारताला 2-0 अशी आघाडी घेण्यापासून रोखण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे.
हरमनप्रीत कौरचं कमबॅक!
दुसऱ्या सामन्यातून टीम इंडियाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हीचं कमबॅक होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. हरमनप्रीतला पहिल्या सामन्याआधी नेट्समध्ये सरावादरम्यान डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे हरमनप्रीतला खबरदारी म्हणून पहिल्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे स्मृतीला नेतृत्वाची जबाबदारी मिळाली.
स्मृतीचं शतक आणि भारताचा मोठा विजय
स्मृतीने सलामीच्या सामन्यात नेतृत्व करण्यासह फलंदाज म्हणूनही आपली भूमिका चोखपणे बजावली. स्मृतीने झंझावाती शतक झळकावलं. स्मृतीच्या टी 20i कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. तसेच स्मृती भारतासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक करणारी पहिली महिला क्रिकेटर ठरली. स्मृतीने 112 धावा केल्या. भारताने त्या जोरावर 200 पार मजल मारली आणि 210 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला 211 धावांचं आव्हान मिळालं. मात्र इंग्लंडची घसरगुंडी झाली. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 113 रन्सवर ढेर केलं आणि 97 धावांनी धमाकेदार विजय मिळवला.
दुसरा सामना कोण जिंकणार?
त्यामुळे आता टीम इंडिया विजयी घोडदौड कायम राखत दुसरा सामना जिंकणार की इंग्लंड बरोबरी साधण्यात यशस्वी होणार? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.