राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र या निर्णयाला विरोधकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत ५ जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने १६ एप्रिल आणि १७ जूनचे त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय रद्द केल्याची घोषणा केली. यानंतर मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्र होणारा मोर्चा रद्द करण्यात आला. यानंतर ५ जुलैला मोर्चा काढण्याऐवजी एकत्र विजयी सभा होईल, असे खासदार संजय राऊतांनी जाहीर केले. आता या विजयी सभेचे ठिकाण ठरले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. मराठी माणसाच्या एकजुटीचा हा प्रचंड विजय असून 5 जुलैला मराठी विजय दिवस साजरा केला जाणार आहे, असे सामना वृत्तपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार ठाकरे बंधूंची विजयी सभा वरळी येथील डोम सभागृहात होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची जोरदार आणि जय्यत तयारी सुरु झाली आहे.
मेळाव्याला पक्षीय लेबल लावू नये, राज ठाकरेंची सूचना
याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. त्यांनी मोर्चा रद्द करून विजयी मेळावा घेण्याचा प्रस्ताव दिला, जो राज ठाकरे यांनी स्वीकारला. मात्र, मेळाव्याला पक्षीय लेबल लावू नये, अशी सूचना त्यांनी दिली होती. हा मेळावा सहकाऱ्यांशी बोलून घेऊ. तेही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलतील. कुठे कुठे काय काय घडतंय हे तुम्ही सांगितलं पाहिजे. ५ तारखेच्या मेळाव्याचा निर्णय कुठे होईल हे तुम्हाला सांगू”, असे राज ठाकरे म्हणाले होते.
विजयोत्सव साजरा करणारच – उद्धव ठाकरे
तर उद्धव ठाकरे यांनीही, ५ जुलैचा हा विजयोत्सव साजरा करणारच असल्याचे म्हटले आहे. या मेळाव्याद्वारे मराठी माणसाची एकजूट दाखवणे महत्त्वाचे असून, ही एकजूट कायम ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, गिरणी कामगारांच्या मोर्चातही सहभागी होण्याचे संकेत त्यांनी दिले. या सर्व घडामोडींनंतर, आता ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत वरळीतील डोम सभागृहात ५ जुलै रोजी ‘मराठी विजय दिवस’ साजरा होणार हे निश्चित झाले आहे.