‘हॉटेल भाग्यश्री’वर रोज काहीना काही घडत आहे. कधी तोडफोड तर कधी मारामाऱ्या. हुज्जत आणि हाणामाऱ्या रोजच होत आहेत. त्यामुळे आता मालकाने थेट पुण्याहून बॉडीगार्ड मागवले.
सोशल मीडियात हॉटेलवर एका तरुणाला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्यामागचं कारण समोर आलेलं आहे.
हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्या पत्नीवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. याचा सीसीटीव्ही फुजेट समोर आला असून त्यात एक माथेफिरु तरुण मडकेंच्या पत्नीचा गळा धरताना दिसून येत आहे. या तरुणाने गल्ल्यामध्ये हात घालण्याच प्रयत्न केला होता. त्याला मालकीनीने रोखल्याने त्याने त्यांच्यावरच हात उचलला, असं हॉटेल मालकाने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. शिवाय तशी पोस्टदेखील केली आहे.
हॉटेल भाग्यश्रीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सीसीटीव्ही फुटेज शेअर केला आहे. त्यामध्ये तरुणाने हाच उचलल्याचं स्पष्ट दिसतंय. त्यामुळेच नंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. तोही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या सगळ्या प्रकारांमुळे हॉटेल मालकाने पुण्यातून बाऊन्सर्स मागवले आहेत.
मागे एका लातूरच्या माथेफिरुने हॉटेल बंद असल्याचं कारण सांगत तोडफोड केली होती. अल्पावधीत मोठं यश प्राप्त केल्यामुळे नागेश मडके हे सर्वांच्या डोळ्यावर आले आहेत. शिवाय त्यांनी मागच्याच महिन्यात काळ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी खरेदी केल्यामुळे ते चर्चेत आलेले होते.
‘नाद करतो का! यायलाच लागतंय, हॉटेल भाग्यश्री’ हा त्यांचा डायलॉग सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यांच्या हॉटेलला सातत्याने पडणाऱ्या दांड्या, यामुळे ते ट्रोल होत असतात. त्यातच आता थेट त्यांच्या पत्नीवर हल्ला झाल्याने संताप व्यक्त होत आहे. आपल्यावर जळणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचं मडके सांगतात.