पैशांची देवाणघेवाण ही बँकिंग प्रणालीतील अत्यंत संवेदनशील बाब मानली जाते. तिथे जर एखादी चूक घडली, तर त्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात याचे जिवंत उदाहरण लोणी काळभोर तालूका हवेली येथे सोमवारी सायंकाळी पाहायला मिळाले.
एका एटीएममधून ५०० रुपये काढण्यासाठी गेलेल्या नागरिकाला चक्क 2 हजार पाचशे रुपये मिळाले.
हा प्रकार संध्याकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आला आणि पाहता पाहता या बातमीचा परिसरात गाजावाजा झाला. त्यानंतर त्या परिसरातील नागरिकांनी त्वरित मित्रपरिवार यांना ही माहिती दिली आणि त्या बँकेच्या एटीएमवर (Atm) काही मिनिटांतच तेथे नागरिकांची मोठी झुंबड जमली.
सुमारे दोन तास हा प्रकार चालू राहिला. दरम्यान, अनेक नागरिकांनी परत परत व्यवहार करून मोठ्या प्रमाणावर पैसे काढले. काहींनी व्हिडिओही काढले आणि सोशल मीडियावर अपलोड केले. त्यामुळे ही घटना अजूनच व्हायरल(Viral) झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना तात्काळ याबाबत सूचित केले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आणि तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे मान्य केले. सदर एटीएम तात्काळ बंद करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या धम्माल प्रतिक्रिया
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतक ५०० रुपये टाका आणि ₹2,५०० मिळवा” अशा प्रकारचे मजकूर आणि क्लिप्स वेगाने पसरत आहेत. त्यामुळे ही घटना केवळ लोणी काळभोरपुरती मर्यादित न राहता पुणे परिसरातही चर्चेचा विषय बनली आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.