छोट्या पडद्यावर पुढील महिन्याभरात काही नवीन कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत. यात स्टार प्रवाहसोबतच झी मराठीचा देखील समावेश आहे. झी मराठीवर लवकरच ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सुरू होणार आहे.
२ वर्षांपूर्वी या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. तब्बल १० वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता. मात्र कालांतराने तोच तोचपणा आल्याने वाहिनीने कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा ‘चला हवा येऊ द्या सीझन २’ भेटीला येणार आहे. मात्र यात निलेश साबळे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार नाहीये.
निलेश आणि झी मराठीचं भांडण
‘चला हवा येऊ द्या’ म्हटलं की निलेश साबळे हे नाव आपोआप उच्चारलं जातं. या कार्यक्रमाचा कर्ताधर्ता निलेश होता. दिग्दर्शनापासून सूत्रसंचालनापर्यंत सर्व जबाबदारी निलेश सांभाळत होता. मात्र हा कार्यक्रम बंद झाला आणि निलेश कलर्स मराठीवरील ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमात दिसला. त्यावरून झी मराठी आणि निलेश साबळे यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा होती. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या २’ ची घोषणा झाली. त्यामुळे या कार्यक्रमात कोण कोण दिसणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आता अखेर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोण करणार हे समोर आलंय.
‘हा’ अभिनेता करणार सूत्रसंचालन
आता नव्याने सुरू होणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या २’ मध्ये निलेशच्या जागी लोकप्रिय अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आजवर अभिजीतनं कथाबाह्य कार्यक्रम, पुरस्कार सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे. त्याच्या निवेदनाचा वेगळा चाहतावर्ग आहे. आता तो एका गाजलेल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनचा सूत्रधार म्हणून जबाबदारी उचलणार आहे. तर निलेशच्या जागी दिग्दर्शक म्हणून प्रियदर्शन जाधव, अमोल पाटील आणि योगेश शिरसाट यांची वर्णी लागलीये.
लेखकांच्या टीममध्ये प्रियदर्शन जाधव, योगेश शिरसाट यांच्यासह अभिषेक गावकर, रोहित कोतेकर, पुर्णानंद वांडेकर, अनिश गोरेगांवकर हेसुद्धा असणार आहेत. श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भरत गणेशपुरे यांच्यामध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे या नव्या नावाची भर पडली आहे.