जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानी कलाकार, अभिनेते, क्रिकेटपटू यांची समाजमाध्यमावरील खाती भारतात बंद केली होती. आता मात्र हे सोशल मीडिया खाते भारतात दिसत आहेत. भारताने पाकिस्तानमधील अभिनेते, अभिनेत्री, क्रिकेटपटू यांच्या खात्यांना बॅन केले होते.
भारताकडून माध्य अद्याप अधिकृत घोषणा नाही
मिळालेल्या माहितीनुसार भारतात आता काही पाकिस्तानी कलाकार, क्रिकेटपटू यांचे सोशल मीडिया अकाऊंट्स दिसत आहेत. मात्र सरकारने अद्याप ही बंदी उठवल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
कोणकोणत्या कलाकारांवरील बंदी उठवली?
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पाकिस्तानमधील अनेक चित्रपट, छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांचे इन्स्टाग्राम खाते भारतात दिसत आहेत. यामध्ये सबा कमर, मावरा होकेन, अहज रजा मीर, हानिया आमीर, युमना झैदी, दानिश तैमूर या कलाकारांचा समावेश आहे.पहलगाम हल्ल्यानंतर या सर्वच कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट्स भारतात बॅन करण्यात आले होते.
यूट्यूब चॅनेल्सही दिसायला लागले
याशिवाय भारतात हम टीव्ही, एआरवाय डिजिटल, हर पल जिओ यासारखे पाकिस्तानी मनोरंजन, न्यूज चॅनेल्सचे यूट्यूब खातेही भारतात दिसू लागले आहे.
भारताने नेमका काय निर्णय घेतला होता?
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पवलं उचलायला सुरुवात केली होती. त्याअंतर्गत भारताने पाकिस्तानमधील अनेक अभिनेते, अभिनेत्री यांचे इन्स्ट्रागाम तसेच अन्य सोशल मीडिया खाते बंद करून टाकले होते. तसेच साधारण 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवरही भारताने बंदी आणली होती. यामध्ये Dawn News, Samaa TV, ARY News आणि Geo News या चॅनेल्सचा समावेश होता.
पाकिस्तानी सेलिब्रिटींनी व्यक्त केली होती नाराजी
या निर्णयाचे अनेक भारतीय नागरिकांनी स्वागत केले होते. तर ज्या पाकिस्तानी सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाऊंट बंद करण्यात आले होते, त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता मात्र यातील काही सेलिब्रिटींची खाती पुन्हा एकदा दिसायला लागली आहेत. भारताने मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.