ज्यांना आरोग्याशी संबंधित शासकीय योजनांतून मदत मिळू शकत नाही, अशांसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल आवाडे यांनी 90 पेक्षाही अधिक रुग्णांना 75 लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे. इतकेच नव्हे तर ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा 11 रुग्णांना आमदार आवाडे यांनी विविध रुग्णालयात तब्बल 63 लाख रुपयांच्या मोफत शस्त्रक्रिया करून देत नवजीवन दिले आहे.
बदलत्या काळानुरुप जीवनशैलीसुध्दा बदलत चालली आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या समस्याही वाढत चालल्या आहेत. त्या अनुषंगाने शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. खाणे-पिणे बदलत चालल्याने नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्यासह आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेत यकृत, मूत्रपिंड, अस्थिमज्जा प्रत्यारोपण, सर्व प्रकारचे कर्करोग, मेंदूचे आजार, हृदयरोग, नवजात बालकांचे आजार, गुडघा, हात, खुबा रिप्लेसमेंट, डायलेसिस, विद्युत जळीत रुग्ण, अपघातातील रुग्ण यांच्यावर उपचारासाठी मदत केली जाते.
शासनाच्या इतर कोणत्याही योजनेतून मदत व उपचार मिळत नसल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेतून मदत उपलब्ध होते. महात्मा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेतून उपचार घेणाऱ्यांना या योजनेतून मदत मिळत नाही. या योजनेच्या लाभासाठी अंदाजपत्रक, १ लाख ६० हजारापर्यंतचा तहसीलदारांचा उत्पन्नाचा चालू आर्थिक वर्षाचा दाखला, स्थानिक मंत्री, खासदार, आमदार यांचे शिफारसपत्र, शिधापत्रिका, आधार कार्डची झेरॉक्स अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील अनेक गरजू रुग्णांना आमदार राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेतून मदत मिळवून दिली आहे. शहर व ग्रामीण परिसरातील 90 पेक्षा अधिक गरजू रुग्णांना 75 लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे. या मदतीसाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करून या माध्यमातून जीवनदान मिळवून दिले आहे.
त्याचबरोबर ज्या आजारांचा शासकीय योजनेत समावेश नाही आणि आर्थिक परिस्थिती नसलेल्या रुग्णांसाठी आमदार राहुल आवाडे यांनी पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, मिरज आदी ठिकाणच्या विविध रुग्णालयात 11 रुग्णांवर 63 लाख रुपये खर्चाच्या मोफत शस्त्रक्रिया करून दिल्या आहेत. त्यामध्ये हृदविकार, मुत्राशय, पाठीचा कणा, न्युरो आदी संदर्भातील शस्त्रक्रियांचा समावेश आहे. याद्वारे नवजात बालकांसह वयोवृद्ध अनेक रुग्णांना नवजीवन लाभले आहे.