शुबमन गिलच्या नेतृत्वात कसोटी पर्वाला सुरुवात झाली आहे. पहिला सामना गमावला, तसेच दोन सामन्यात नाणेफेकीचा कौल काही बाजूने लागला नाही. पण असं असताना शुबमन गिलच्या बाबतीत एक जमेची बाजू अधोरेखित होताना दिसत आहे. कर्णधारपदाची जबाबदारी मिळताच शुबमन गिलच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. 11 वर्षांपूर्वी असंच काहीसं विराट कोहलीच्या बाबतीत घडलं होतं. आता कसोटी क्रिकेटमध्ये शुबमन गिल त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे जातान दिसत आहे. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शुबमन गिलची बॅट चांगलीच तळपताना दिसत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात दीड शतकी खेळी करत त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात गिलने एजबॅस्टन मैदानावर भारतीय कर्णधाराने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला.
कर्णधारपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वी शुबमन गिलचा रेकॉर्ड काही खास नव्हता. त्याची कामगिरी आशियाबाहेर काही खास नव्हती. इतकंच काय तर मागच्या पाच वर्षात त्याने 50 धावांचा पल्ला गाठला नव्हता. इंग्लंडविरुद्ध मागच्या तीन कसोटी सामन्यात त्याने फक्त 88 धावा केल्या होत्या. मात्र या सर्व उणीवा बाजूला सारून शुबमन गिलने नेतृत्व करत असताना फलंदाजीत चमक दाखवली आहे. लीड्स कसोटीनंतर एजबेस्टनमध्येही शुबमन गिलने शतकी खेळी केली. तसेच विराट कोहलीचा एजबेस्टनवरील विक्रम मोडला.
शुबमन गिलच्या दीड शतकी खेळीपूर्वी एजबेस्टनमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावावर होता. त्याने 149 धावा केल्या होत्या. 2018 च्या कसोटीत 149 धावांची खेळी केली होती. गिलच्या आधी या मैदानावर शतक करणारा कोहली एकमेव भारतीय कर्णधार होता. मात्र आता शुबमन गिलने 150 हून अधिक धावांची खेळी केली आहे. जर त्याचा जम बसला आणि इतर फलंदाजांची साथ मिळाली तर आरामात 200 पार धावा करेल.
शुबमन गिलने या मालिकेत आतापर्यंत फक्त 3 डावात 300 हून अधिक धावा केल्या आहेत. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी त्याने आशिया खंडाबाहेर कसोटी मालिकेत 300 हून अधिक धावा केल्या. यासह इतक्या धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार बनला आहे.