किरकोळ वादातून झालेल्या शिवीगाळीचा राग मनात धरून सातजणांच्या टोळक्याने एका तरुणाला दगड आणि लाकडी बॅटने बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना गांधीनगर (ता. करवीर) येथे घडली.
आशुतोष सुनील आवळे (वय 26, सध्या रा. आसुर्ले-पोर्ले, ता. पन्हाळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सातही संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या कारवाईत शंकर बापू बनसोडे (वय 19), राजू सचिन काळोखे (20), शुभम संजय कांबळे (19), करण महेश डांगे (18, सर्व रा. गांधीनगर) यांच्यासह तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रविवारी रात्री उशिरा सुनील आवळे यांनी पोलिसांना आपला मुलगा आशुतोष याचा मृतदेह गांधीनगर येथील पंचगंगा नदीच्या काठावर सापडल्याची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक रुग्णालयात पाठवला. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे आशुतोषचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. यानंतर, सुनील आवळे यांनी आपल्या मुलाचा खून झाल्याची फिर्याद गांधीनगर पोलिस ठाण्यात दाखल केली.
…असा लावला छडा पोलिस अधीक्षक
योगेशकुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीने मारेकर्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखाली चार तपास पथके तयार करून तपासाची चक्रे फिरवली.
पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने कोयना वसाहतीतून करण डांगे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान करणने गुन्ह्याची कबुली दिली. शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तो आणि त्याचे मित्र मोबाईलवर गेम खेळत बसले होते. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आशुतोष आवळेने तिथे येऊन ‘इथे काय करताय?’ असे विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने आपल्याजवळील एडका नावाचे हत्यार दाखवून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. वाद वाढत गेल्याने करण आणि त्याच्या मित्रांनी आशुतोषला दगड आणि लाकडी बॅटने मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्वांनी मिळून त्याचा मृतदेह पंचगंगा नदीच्या शांतिप्रकाश घाटावर फेकून दिला.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. खुनाची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गांधीनगर पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती घेतली आणि तपासाबाबत सूचना दिल्या.