रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) चा वेगवान गोलंदाज यश दयाल याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका तरुणीने ही तक्रार दाखल केली असून, तिने यशसोबत पाच वर्षांपासून संबंध असल्याचा दावा करत भावनिक, मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप केला आहे.
यश दयालवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे कलम फसवणूक करून किंवा लग्नाचे खोटे वचन देऊन लैंगिक संबंध ठेवण्याशी संबंधित आहे. या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. प्राथमिक चौकशीनंतर इंदिरापुरम पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने आरोप केला आहे की, “त्याने लग्नाचे खोटे वचन देऊन माझ्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि माझी ओळख त्याच्या कुटुंबाशी करून दिली. त्यांनी मला सून करून घेण्याचे आश्वासन दिले होते. मी हे नाते पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने जपले.”
नैराश्य आणि आत्महत्येचा प्रयत्न
या सर्व प्रकारामुळे आपण नैराश्यात गेलो आणि त्यासाठी उपचारही घ्यावे लागले, असेही तरुणीने पोलिसांना सांगितले. तिने पुढे आरोप केला, “मानसिक त्रासातून बाहेर पडू न शकल्याने मी अनेकदा माझे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला, पण तो आणि त्याचे कुटुंबीय मला खोटी आश्वासने देत राहिले. त्याचे इतर मुलींसोबत असलेले संबंध माझ्यासाठी अत्यंत मानसिक धक्का देणारे होते आणि त्यामुळे मी पूर्णपणे कोलमडून गेले.”
“इतर मुलींसोबत संबंध; संशय घेतल्यावर मारहाण”
पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, १७ एप्रिल रोजी, यशसोबत बोलणाऱ्या एका दुसऱ्या मुलीने तिच्याशी संपर्क साधला आणि त्याच्या अफेअर्सचे पुरावे शेअर केले. यशच्या कुटुंबाला याबद्दल माहिती होती, पण ते तिला लग्नाचे आश्वासन देत राहिले. आणखी तीन मुलींनी तिच्याशी संपर्क साधून असेच अनुभव शेअर केले आहेत. जेव्हा तिने यशला इतर मुलींशी असलेल्या संबंधांबाबत विचारले, तेव्हा त्याने मारहाण केली. त्याच्या या वागणुकीमुळे मी पूर्णपणे खचून गेले, असे तिने सांगितले.
“न्यायाचीच अपेक्षा, पुरावे माझ्याकडे आहेत”
“मी द्वेष करत नाही, पण माझ्या आत्मसन्मानासाठी न्याय हवा आहे. माझ्याकडे आमच्या नात्याचे पुरावे – चॅट्स, व्हिडिओ कॉल्स, फोटो इत्यादी आहेत. प्रशासनाने निष्पक्ष आणि तातडीने कारवाई करावी, हीच अपेक्षा आहे. जेव्हा व्यवस्था सत्याच्या बाजूने उभी राहते, तेव्हा अनेक गप्प बसलेल्या मुलींना बळ मिळते,” असे भावनिक वक्तव्य पीडित तरूणीने केले आहे.
सोशल मीडियावरून झाली होती ओळख
पीडित तरूणीची आणि यशची ओळख सोशल मीडियावरून झाली आणि नंतर ते प्रयागराजमध्ये भेटले. एका एड-टेक कंपनीत पूर्वी काम करणारी ही तरुणी यशच्या घरी राहिली होती, असा दावा तिने केला आहे. मात्र, यशच्या वडिलांनी तिला ओळखत नसल्याचे म्हटले आहे.