बदलते हवामान आणि अन्न-पाण्याच्या ढासळत्या गुणवत्तेमुळे होणार्या अॅलर्जीचा सामना करत असलेल्या कोल्हापूरकरांना आता नव्या समस्येने ग्रासले आहे. घरात वावरणार्या साध्या मुंग्या आणि कीटकांचा चावाही आता गंभीर अॅलर्जीचे कारण ठरत आहे.
गेल्या काही महिन्यांत विविध प्रकारच्या अॅलर्जीच्या रुग्णांमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे, ज्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
सध्या घरात आणि परिसरात लाल व पिवळ्या मुंग्या, झुरळे यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक ठिकाणी पेस्ट कंट्रोल करूनही सार्वजनिक स्वच्छतेअभावी कीटकांचा उपद्रव कायम आहे. या कीटक आणि मुंग्यांच्या चाव्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, त्वचा लालसर होणे, सूज येणे आणि तीव्र खाज सुटणे अशा तक्रारी घेऊन अनेक रुग्ण दवाखान्यात येत आहेत.
अॅलर्जीचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे
पूर्वी साध्या औषधोपचारांनी बर्या होणार्या या अॅलर्जीवर आता नेहमीची औषधेही प्रभावी ठरत नसल्याचे दिसून येत आहे. कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे वातावरणात मिसळणारी रसायने आणि प्रदूषण यामुळे अॅलर्जीचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे बनत चालले आहे.
कोणते वयोगट जास्त धोक्यात?
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांना याचा सर्वाधिक धोका आहे.
अॅलर्जी म्हणजे काय?
अॅलर्जी म्हणजे शरीराच्या रोगप्रतिकार यंत्रणेने काही निरुपद्रवी घटकांना धोकादायक समजून दिलेली अतिरिक्त प्रतिक्रिया. यामुळे त्वचेचे आजार, श्वसनाचे विकार आणि पचनाच्या समस्या उद्भवतात.
प्रतिबंधासाठी काय करावे?
घरात व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे
पेस्ट कंट्रोलचा योग्य वापर
अन्न व पाण्याची शुद्धता तपासणे
लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे
कोणत्या गोष्टींमुळे अॅलर्जी होते, याचा शोध घेऊन त्यापासून दूर राहणे
डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूररासायनिक खते, बदलते वातावरण आणि प्रदूषित पाणी यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अॅलर्जीचे प्रमाण वाढले आहे. इतर धान्यावर वापरण्यात येणारी कीटकनाशके व औषधांचाही परिणाम अॅलर्जीच्या स्वरूपात आरोग्यावर होत आहे.